लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोपरीतील एका शाळेतील दहावीच्या दोन अल्पवयीन मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांची लैंगिक छळ करणारा सुरक्षा रक्षक विकास चव्हाण (३३) याला ठाणे न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोपरी येथील एका शाळेमध्ये पिडीत मुली शिकत होत्या. २०१६ मध्ये विकास चव्हाण याने या मुलींना शाळेतील एका खोलीमध्ये नेले. तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांची लैंगिक छळवणूक केली. त्यानंतर मुलींनी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. या मुलींपैकी एका मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने ही बाब शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगण्यापूर्वी चव्हाण याने यातील दुसऱ्या मुलीला गाठून हा प्रकार मुख्याध्यापिकेला किंवा पोलिसांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.
आणखी वाचा-कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलीसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत चव्हाण याला अटक केली होती. त्यानंतर शाळेतून चव्हाण याला निलंबित केले होते. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी या खटल्यात ११ साक्षीदार तपासले. सर्व साक्षी पुरावे ग्राहय मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी चव्हाण याला ही पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक एम. डी. जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार विजय सानप आणि अंमलदार सुशिला डोके यांनी काम पाहिले.