|| किशोर कोकणे
३० सुरक्षारक्षकांची नेमणूक, सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव

ठाणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात ठाणे खाडीतील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. भिवंडी येथे कांदळवनांची कत्तल करत काही गोदामे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. पर्यावरणाचा इतका ऱ्हास झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वन विभागाने पुढील हानी टाळण्यासाठी कांदळवनाच्या संरक्षणासाठी ३० सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास काही प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास टाळला जाईल, असा दावा केला जात आहे.

ठाणे खाडीत मोठे कांदळवन क्षेत्र उभे राहिले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या कांदळवनावर राडारोड्याचा भराव टाकून भूमाफिया ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भिवंडी येथेही कशेळी भागात खाडीकिनारी असलेल्या कांदळवनावर राडारोडा टाकून त्याठिकाणी अनधिकृत बांधकामे, गोदामे तयार झाली आहेत. वन विभागाकडे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या तसेच दुर्लक्षामुळे येथील कांदळवन क्षेत्राची हानी सुरूच आहे. हे कांदळवन क्षेत्र वाचविण्यासाठी वन विभागाने उशिरा का होईना, पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भिवंडीतील कशेळी येथील कांदळवनाच्या क्षेत्राच्या संरक्षणासाठी वनविभागाने ३० सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जावी, असा प्रस्ताव वन विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. तसेच येथील काही भागात सीसीटीव्ही बसविण्यात यावा, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास सुरक्षारक्षक वन विभागाकडे उपलब्ध होऊ शकतात. हे सुरक्षारक्षक कांदळवन क्षेत्राच्या परिसरात गस्ती घालू शकतात. या गस्तीमुळे कांदळवनावर टाकण्यात येणारा भराव रोखला जाऊ शकतो,  तसेच भूमाफियांविरोधात कारवाई करणेही शक्य होणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून येथील कांदळवन क्षेत्रावर वन विभागाचीही नजर राहणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंदर्भातील प्रस्ताव वन विभागाने पाठविला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर कशेळी येथील कांदळवन क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करता येऊ शकतात. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही कांदळवन क्षेत्र वाचविता येणे शक्य होणार आहे.  – चेतना शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भिवंडी, मुंबई कांदळवन संधारण घटक.

Story img Loader