कल्याण – टिटवाळा, बल्याणी, वासुंद्री रस्ता, गणेश मंदिर परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा अनेक महिने उभी करून ठेवण्यात आलेली दुचाकी, चारचाकी, भंगार वाहने उचलण्याची मोहीम अ प्रभाग कार्यालयाने सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टिटवाळा, मांडा भागातील लोकवस्ती वाढली आहे. खासगी वाहनांबरोबर रिक्षांची संख्या वाढत आहे. दररोज टिटवाळा येथे सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी भाविक येतात. अंगारकी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाखभर भाविक टिटवाळ्यात लोकल, खासगी वाहनाने येतात. ही वाहने आणि बाहेरील नागरिक टिटवाळा भागात आले की रस्त्यावर कोंडीचे चित्र दिसते. रस्त्यांच्या कडेला अनेक महिने उभी करून ठेवण्यात आलेली वाहने वाहतूक कोंडीत भर घालतात.

हेही वाचा – ठाणे : सिगारेट दिली नाही म्हणून एकावर जीवघेणा हल्ला

टिटवाळा भागात रस्ते, चौक सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. या सुशोभिकरणात भंगार वाहनांची भर नको म्हणून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या आदेशावरून टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री रस्ता भागातील रस्त्यांवर बेवारसपणे उभी करून ठेवण्यात आलेली वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे. ही वाहने उचलण्यापूर्वी या वाहनांवर मालकांना पूर्वसूचना देणारी एक नोटीस लावली जाते. वाहन मालकांनी सात दिवसांच्या आत ते वाहन उचलून घ्यावे, असे सूचित केले जाते. सात दिवसानंतर ही वाहने पालिकेकडून जेसीबीच्या साहाय्याने उचलून पालिकेच्या भूखंडावर जमा केली जात आहेत. रस्त्यावरील बेवारस, भंगार वाहने उचलण्यात आल्याने रस्ते प्रशस्त दिसत आहेत. तसेच सकाळच्या वेळेत सफाई कामगारांना या वाहनांमुळे त्या भागात सफाई करता येत नव्हती. त्यांचाही मार्ग ही वाहने उचलण्यात आल्याने मोकळा झाला आहे, असे वाघचौरे यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा

फेरीवाला नियंत्रण पथकप्रमुख नंदकिशोर वाणी, रवींद्र गायकवाड, सकपाळ, धर्मेंद्र सोनावणे, दत्तू शेवाळे या पथकाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही याचे नियोजन केले आहे, असे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seiz action on abandoned vehicles on road in titwala ssb
Show comments