भाईंदर : – वाहतुकीदरम्यान मेलेल्या कोंबड्यांची ३० रुपयांत मुंबईमधील हॉटेल व्यवसायिकांना विक्री होत असल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. रविवारी दुपारी काशिमीरा येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला मेलेल्या कोबड्या विक्रीसाठी नेत असताना रंगेहाथ पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील हॉटेलांमध्ये बॉयलर कोंबड्यांची विक्री लहान टेम्पोतून केली जाते. यावेळी वाहतुकीदरम्यान अनेक कोंबड्या मरण पावतात. हे टेम्पो दहिसर टोलनाक्याजवळ असेलल्या काशिमीरा उड्डाणपुलाखाली उभे असतात. तेव्हा या मेलेल्या कोंबड्या हॉटेलविक्रेत्यांना स्वस्तात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा – ठाणे पालिकेतील ४५ सफाई कामगारांना थकीत वेतन मिळणार

हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गाच्या यापूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा

रविवारी दुपारच्या सुमारास अश्याच मेलेल्या कोंबड्या घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मीरा भाईंदर मनसे विभागीय सचिव सचिन जांभळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मेलेल्या कोंबड्या आपण नाल्यात फेकून देत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. मात्र कुठल्या नाल्यात फेकल्या ते या व्यक्तीला सांगता आले नाही. अधिक चौकशीत या मेलेल्या कोंबड्यांची विक्री मुंबईच्या बांद्रा परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांना करत असल्याची कबुली त्याने दिली. ३० रुपयांना एक कोंबडी विकत असल्याचे त्याने सांगितले. या सर्व घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर वायरल होत आहे. तर याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती जांभळे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selling dead chickens in hotels in mumbai ssb
Show comments