दुरावस्था झालेल्या पालिका शाळांना दुरुस्तीची प्रतीक्षा असतानाच या शाळांचा दर्जा सुधारून या शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याच्या हालचाली अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केल्या आहेत. नुकतीच पालिका शाळांच्याबाबत पालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि कक्ष समन्वयकांची बैठक पार पडली. यात सेमी इंग्रजी शाळेचा प्रस्ताव शिक्षण संचालकांना पाठवण्याच्या सूचना अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिल्या. पालिका शाळांना दोन सत्रामध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
हेही वाचा >>> भिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी
अंबरनाथ नगरपालिका शाळांमध्ये असलेल्या त्रुटी, दुरावस्था गेल्या काही महिन्यात प्रकर्षाने जाणवल्या. गळके छत, प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव आणि शाळांची सुरक्षा असे अनेक मुद्दे चर्चिले गेले.खासगी शिक्षण महागडे होत असताना पालिका शाळांवर सर्वसामान्य, मजूर, कामगार वर्गाच्या विद्यार्थ्यांची मदार आहे. त्यामुळे या शाळांना सुस्थितीत राखून दर्जेदार शिक्षण द्यावे अशी अपेक्षा असते. मात्र गेल्या काही दिवसात शाळांच्या समस्या समोर आल्या. याबाबत नुकतीच स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्याध्यापक आणि कक्ष समन्वयक यांची बैठक घेतली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ उपस्थित होते. या बैठकीत अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांतील पट संख्या वाढवून शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार डॉ. किणीकर यांनी केले. याआढावा बैठकीत नगरपालिका शाळांच्या जुन्या, जीर्ण झालेल्या वास्तूंबाबत चर्चा करण्यात आली. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या सर्व शाळांची योग्य ती दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले. सोबतच सर्व शाळांवर दोन पाळ्यामध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशा सूचना आमदार डॉ. किणीकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना केल्या. अंबरनाथ पालिकेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या. अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मंदिर परिसरातील स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू करण्यात आलेल्या शाळेमध्ये तसेच अंबरनाथ पश्चिम भागातील पट संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात यावी. त्याकरिता आवश्यक शिक्षक मानधन तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना ही यावेळी उपस्थित शिक्षण अधिकाऱ्यांना आमदार डॉ. किणीकर यांनी दिल्या. यामुळे अंबरनाथ पालिकेच्या शाळांमध्ये नवा शिक्षणाचा पर्याय उपलब्ध होईल असेही डॉ. किणीकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा >>> मुंबईतील धोकादायक कचरा पनवेलमध्ये
पालिका शाळांमध्ये पट संख्या वाढविण्याच्या दृष्टीने पालकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता देखील अभियान राबविण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दूल शेख, नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, प्रशासन अधिकारी श्री. गजानन मंदाडे सर्व मुख्याध्यापक आणि कक्ष समनव्यक उपस्थित होते.