ठाणे : येथील सावरकर नगर भागातील म्हाडाच्या सोसायटय़ांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय आमच्या पाठपुराव्यामुळेच झाल्याचा दावा करत राष्ट्रवादीने शिवसेनेवर टीका केली आहे. तर, शिवसेनेनेही आमच्या पाठपुराव्यामुळेच हे काम झाल्याचे सांगत राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. यामुळे राज्यात एकत्रित सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ठाण्यातील नेत्यांमध्ये कामाचे श्रेय घेण्यावरून पुन्हा जुंपल्याचे चित्र दिसून येत आहे.
खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई रंगली होती. हा वाद निवळत नाही तोच आता सावरकर नगर भागातील म्हाडाच्या सोसायटय़ांचे लीज भाडे आणि अकृषिक करांवरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद सुरू झाला आहे.
सावरकर नगर भागामध्ये म्हाडाच्या ११० सोसायटय़ा आहेत. सोसायटय़ांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामावरूनच शिवसेना – राष्ट्रवादीत पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाडेपट्टी करार आणि अकृषिक करांवरील व्याज आणि दंड माफ करून या सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. मात्र, हा प्रश्न निकाली लागल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. परंतु दुर्दैवाने शिवसेना या कामाचे श्रेय घेण्याचा आटापिटा करत आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. यापूर्वी असे दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती. परंतु नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची पद्धत वाढीस लागली आहे. काम दुसऱ्याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत. ते कलियुगातील नारद आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. गोरगरिबांना फायदा व्हावा, या उद्देशातून जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला असतानाही बारटक्के यांनी पत्रके वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांना आम्ही खुले आव्हान देतो की, म्हाडाच्या ११० सोसायटयांचा प्रश्न कोणी मार्गी लावला. त्यासाठी किती वेळा बारटक्के म्हाडा कार्यालयात गेले, किती अधिकाऱ्यांशी बोलले, ही प्रक्रिया कशी होती, किती वेळा नागरिकांच्या बैठका घेतल्या, याचे पुरावे त्यांनी सादर केले तर आपण राजकारण सोडू. तसेच पुरावे सादर करता आले नाही तर बारटक्के यांनी जाहीर माफीनाम्याचीही पोस्टर्स लावावीत, असे आव्हान अमित सरैया यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीवर पलटवार
सोसायटय़ांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्यासाठी २०२० पासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या स्तरावर व्याज आणि दंड माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. म्हाडाचे विषय आम्ही पूर्वीपासूनच सोडवीत आहोत. पाच वर्षे गायब असलेले सरैया आता निवडणुकांच्या तोंडावर या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला श्रेय घेण्याची गरज नसून म्हाडावासीयांचा आमच्यावर विश्वास आहे. तसेच आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवून निवडून यावे आणि मग बोलावे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी दिली.

Story img Loader