ठाणे : ठाणे लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार यावरुन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेच्या शुभारंभ सोहळ्यावरुन या दोन पक्षांत जोरदार जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हा सोहळा आयोजित करत असताना भाजप आमदार संजय केळकर यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची ही रित म्हणजे ‘मुह मे मोदी और ठाण्यात भाजप बेनाम’ या शब्दात केळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टीएमटी सेवेत सवलत देण्याची माझी अनेक वर्षांची मागणी होती. ही मागणी आज पूर्ण होत असल्याने त्याचे मी स्वागत करतो असे आमदार केळकर म्हणाले. मात्र या कार्यक्रमापासून भाजपला दूर ठेवण्यात आले आहे का, या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला. खर म्हणजे भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्यात हे नवीन नाही. शिवसेना अखंड होती तेव्हापासून २५-३० वर्षे आम्ही या पक्षासोबत ठाणे जिल्ह्यात काम केले आहे. आणि आताही विभक्त शिवसेनेच्या एका गटासोबत आम्ही काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या या वागणुकीची आम्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना सवय झाली आहे. एकतर्फी निर्णय, धोरण, आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलवायचे नाही, ही शिवसेनेची जुनी रित राहिली आहे, अशा शब्दात केळकर यांनी शिवसेना नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – ठाण्यातील उड्डाणपुलांवरील ध्वनीरोधकचे भाग चोरीला ?
मी या विषयावर प्रतिक्रिया देणार नव्हतो, मात्र सहनशक्तीलाही मर्यादा असते. भाजपचा कार्यकर्ता अत्यंत स्वाभीमानी कार्यकर्ता आहे. असे असताना वेळोवेळी आम्हाला शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे. मुखात मोदींचे नाव आणि ठाण्यात भाजप बेनाम अशा पद्धतीने शिवसेनेचे काम राहिले आहे. त्यामुळे आम्हाला डावलले जाण्याची सवय झाली आहे, परंतु अशा अपमानाला मर्यादा असते, अशा शब्दात केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक महत्वाचे कार्यक्रम ठाण्यात घेण्याची आवश्यकता असताना ते कार्यक्रम भाजपच्या मतदारसंघात होऊ नये अशापद्धतीची रचना शिवसेनेकडून केली जाते. नोकरशाही हतबल आहे, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी हतबल आहे. युतीचा धर्म पाळायची गोष्ट करायची आणि प्रत्यक्षात वेगळेच वागायचे हे योग्य नाही असे केळकर म्हणाले. आम्हाला अपमानीत केलेले चालणार नाही आणि तुम्हाला ते परवडणारही नाही, असा इशाराही केळकर यांनी दिला.