कल्याण – कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक अशोक दीक्षित (६३) यांनी पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत मागील ४४ वर्षाच्या कालावधीत १८९ पाॅवर लिफ्टींग स्पर्धांच्या माध्यमातून एकूण १०२ सुवर्ण पदके पदके पटकावली आहेत. याशिवाय २३ रौप्य, २७ कास्य पदकांचे ते मानकरी आहेत. रविवारी कल्याणमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरिय पाॅवर लिफ्टिंग बेंंच, प्रेस आणि डेड लिफ्ट स्पर्धेत अशोक दीक्षित यांनी तीन सुवर्ण पदकांचा मान मिळविला.

या तिन्ही स्पर्धांमध्ये कणखर पुरूष (स्ट्राॅंग मॅन) किताबाचे ते मानकरी ठरले. वयाच्या ६२ व्या वर्षीही अशोक दीक्षित (६२) आपली प्रकृती सांभाळून हिरिरीने या आव्हानात्मक स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने त्यांचे क्रीडाप्रेमींसह इतर क्षेत्रातील नागरिकांकडून कौतुक होते आहे. अशोक दीक्षित कॅनरा बँकेत नोकरीला होते. अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी बँकेचे प्रतिनिधीत्व केले.

अशोक दीक्षित कल्याणचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सुभेदारवाडा शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्समध्ये पूर्ण केले. ते वाणिज्य पदव्युत्तर पदवीधर आहेत. १९८१ पासून त्यांनी कल्याणमधील नमस्कार मंडळात श्रीबास गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पाॅवर लिफ्टींगचा सराव सुरू केला. नऊ वर्षाच्या सरावानंतर ते आंतर महाविद्यालयीन पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत सहभागी होऊ लागले. या स्पर्धांपासून त्यांना पदके मिळण्यास सुरूवात झाली. पाॅवर लिफ्टींग हाही जीवनाचा भाग म्हणून त्यांनी नोकरी सांभाळून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पाॅवर लिफ्टींग स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली.

या स्पर्धांमध्ये मिळालेल्या उज्जवल यशानंतर अशोक दीक्षित यांनी आपला सराव आणि प्रशिक्षण यात खंड पडू दिला नाही. १९८३ मध्ये त्यांनी कॅनरा बँकेत नोकरीला सुरूवात केली. २००२ मध्ये अर्जेंंटिना येथे झालेल्या जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत त्यांनी भारताला एक सुवर्ण, एक रौप्य पदकाची कमाई करून दिली. अनेक वर्ष ते पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत पंच म्हणून सक्रिय आहेत.

भारतामधील एकाच खेळात वडील आणि मुलगी अनुजा दीक्षित एकाच व्यासपीठावर सहा वेळा सहभागी झाल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डसमध्ये त्यांची नोंद झाली आहे. पत्नी अनघा दीक्षित, कुटु्ंबीय, नमस्कार मंडळाचे सर्व पदाधिकारी, सहकारी खेळाडु यांच्या उत्तम साथीमुळे हा यशस्वीतेचा प्रवास आपण केला, असे पाॅवर लिफ्टर अशोक दीक्षित यांनी सांगतात. पाॅवर लिफ्टींग स्पर्धेतील कामगिरीबद्दल अशोक दीक्षित यांना कल्याण रत्न, चित्तपावन ब्राह्मण महासंघाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

आतापर्यंतच्या प्रवासात आपण पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत एकूण ९९ सुवर्ण पदके पटकावली. कल्याणमध्ये रविवारी झालेल्या स्पर्धेत आपणास तीन सुवर्ण पदके मिळाल्याने आपण पदकांची शंभरी पार केली आहे. पाॅवर लिफ्टींगच्या आपल्या एकूण १८९ स्पर्धा झाल्या आहेत. २०० पर्यंत या स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रकृती तंदुरुस्त ठेऊन अशा स्पर्धांमध्ये यापुढे सहभागी होत राहणार आहे. – अशोक दीक्षित, पाॅवर लिफ्टर, कल्याण