लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावर गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान एका ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला एका ३५ वर्षाच्या भुरट्या चोराने लुटले. या ज्येष्ठ नागरिकाला तुमच्या सदऱ्याच्या मागील भागात मानेवर किडे पडले आहेत, असे सांगून त्यांच्या हातामधील पैसे असलेली पिशवी बाजुला ठेवण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिक सदरा काढण्यात मग्न असताना भुरट्या चोराने ज्येष्ठ नागरिकाने बाजुला ठेवलेली पैशाची पिशवी घेऊन पळ काढला.

पांडुरंग बाळाजी सुर्वे (७५) असे लूट झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागात राहतात. लुटीचा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ पोळीभाजी केंद्रासमोर घडला. यासंदर्भात पांडुरंग सुर्वे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डोंबिवलीत दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

तक्रारदार सुर्वे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की डोंबिवली पश्चिमेतील एका बँकेमधून तीस हजार रूपये काढले. ते पैसे आपण जवळील पिशवीत सुरक्षितपणे ठेवले. पिशवीत बँकेचे पासबुक होते. बँकेची कामे झाल्यानंतर घरातील किराणा भरण्याच्या कामासाठी आपण एका किराणा दुकानादाराकडे सुभाष रस्ता भागात पायी जात होतो. त्यावेळी सुभाष रस्त्यावर स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्रासमोर आल्यावर आपल्याला एका ३५ वर्षाच्या इसमाने हाक मारून थांबविले.

त्यानंतर तो इसम जवळ आला. त्याने तुमच्या मानेवर मागील बाजुस बारीक किडे पडले आहेत. त्या किड्यांचा तुम्हाला त्रास होईल. सदरा खराब होईल, अशी भीती इसमाने ज्येष्ठ नागरिकाला घातली. तुम्ही सदरा काढा. आपण सदरा पाण्याने धुऊन काढू. इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने सदरा काढण्यासाठी हातामधील पिशवी बाजुच्या एका खुर्चीवर ठेवण्यास सांगितली. तक्रादार सुर्वे सदरा काढण्यात मग्न असताना भुरट्याने तेवढ्या संधीचा गैरफायदा घेऊन, सुर्वे यांना बोलण्यात गुंतवून भुरट्याने खुर्चीवर ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन पळ काढला.

सदरा काढल्यावर इसम पिशवी घेऊन कोठे गेला म्हणून तक्रारदाराने आजुबाजुला पाहिले तोपर्यंत भुरटा चोर पळून गेला होता. आपल्या मानेवर किडे पडले आहेत, असे आपणास खोटे सांगून आपली फसवणूक आणि लूट भुरट्याने केली म्हणून पांडुरंग सुर्वे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे याप्रकरणाचा तपास करत आहेत.