डोंबिवली येथील उमेशनगर मधील एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे छप्पर तुटून आगीत घरातील ज्येष्ठ सदस्य गंभीर जखमी झाले. घरातील सामानाची नासधूस झाली. जखमी ज्येष्ठ नागरिकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देवीचापाडा येथे राहणारे हेमंत मोरे (६५) सकाळी कामावर जाण्यासाठी उठले. पूजेसाठी त्यांनी आगपेटीने अगरबत्ती पेटवली. काही क्षणाच्या आत घरात सिलिंडरमधून गळती झालेल्या गॅसने पेट घेऊन सिलिंडरचा स्फोट झाला. टाकीपासून दूर असल्याने मोरे सुदैवाने बचावले. स्फोट इतका भीषण होता की घराच्या छपरा वरील पत्र्यांचा चुराडा झाला. घरातील सामानाचे नुकसान झाले.

स्फोट होताच परिसरातील रहिवासी जागे झाले. अग्निशमन दलाचे जवान शिवाजी म्हात्रे, राजेश कासवे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव ताफ्यासह आले. त्यांनी तातडीने गॅस गळती होत असलेल्या टाकीचा ताबा घेत गळती रोखली. चाळीतील रहिवाशांना काही वेळ बाजुला जाण्यास सांगण्यात आले. जखमी हेमंत मोरेना तत्काळ त्यांचा मुलगा श्रीनिवास यांनी पालिका रुग्णालयात दाखल केले. मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. छप्पर तुटल्याने पावसाचे पाणी घरात आल्याने घराची नासाडी झाली आहे.