डोंबिवलीतील घटना; पादचाऱ्यांचे दुर्लक्ष
डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्त्यावरील दोन ज्येष्ठ नागरिकांनी बुधवारी चोरांना चांगलाच हिसका दाखविला. दुचाकीस्वारांच्या उपद्रवामुळे गाजत असलेल्या सावरकर रस्त्यावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चोरी करून पळ काढणाऱ्या चोरांना या ज्येष्ठ नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली दिले.
डोंबिवली पूर्व भागातील सावरकर रस्ता हा दक्षिण उत्तर एक किलोमीटर लांबीचा सरळ रस्ता आहे. या रस्त्यावरुन पाथर्ली, गोग्रासवाडी भागात राहणाऱ्या आणि सावरकर रस्त्याच्या दुतर्फा राहत असलेल्या रहिवाशांची सतत वर्दळ असते. बुधवारी सायंकाळी सात वाजता या मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी होती. धूमस्टाईल दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करण्यासाठी सावरकर रस्त्यावरील प्रत्येक चौकाआड दोन वाहतूक पोलीस व वाहतूक सेवक तैनात आहेत. सावरकर रस्त्यावरील पुष्पराज सोसायटीच्या समोर एक चारचाकी इंडिका गाडी उभी होती. त्यामागे एक दुचाकी उभी करून ठेवली होती. इंडिका वाहनाचा आडोसा घेऊन गटाराच्या कडेला बसून भर रस्त्यात दोन तरुण दुचाकीजवळ काहीतरी करीत असल्याची जाणीव सावरकर रस्त्यावर राहणारे नितीन डोंगरे या ज्येष्ठ नागरिकाला झाली. त्यांनी काही क्षण त्या दोन तरुणांच्याकडे पाहिले. त्यानंतर ते या तरुणांच्या दिशेने वेगाने गेले. तसे दुचाकी वाहनाचे कुलूप तोडून ती चोरण्याच्या प्रयत्नात असलेले दोन्ही तरुण हातामधील पाने बाजूला फेकून देऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले. तात्काळ डोंगरे यांनी दोन्ही तरुणांना घट्ट मिठी मारुन चोरांना पकडता यावे म्हणून आरोळ्या ठोकल्या. काही क्षण एकही पादचारी नितीन डोंगरे यांना मदत करण्यासाठी पुढे येईना. त्याच वेळी एक ज्येष्ठ पादचारी अशोक कुलकर्णी त्यांच्या मदतीला धावून आले. दोघांनी मिळून दोन्ही तरुणांना पकडून ठेवले.
तोपर्यंत सावरकर रस्त्यावरील रहिवासी या तरुणांभोवती जमा झाले होते. एका आजोबांनी तर या दुचाकीचोरांना बेदम चोपायला सुरुवात केली. तात्काळ शेजारील चौकात उभे असलेले वाहतूक पोलीस एम. के. तायडे, पी. बी. राठोड घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही तरुण पळून जाऊ नयेत म्हणून पहिले दोन्ही तरुणांच्या बखोटीला धरुन ठेवले. तोपर्यंत रामनगर पोलिसांचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. या तरुणांची वरात मग, रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. सावरकर रस्त्यावरील रहिवासी अधिक जागरूक झाल्यामुळे रामनगर पोलीस, वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुन्हा दाखल
रघुश्री भोलेनाथ नट (२२, रा. सावरकर रस्ता), सुनील रामजी गौतम (२३, रा. शेलारनगर वसाहत, शेलार नाका) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध रामननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवकाचे नाव
‘आपण तेथे बसलो होतो. काहीही करीत नव्हतो’ असा बचाव हे तरुण करू लागले. एका नगरसेवकाची आम्ही माणसे आहोत असेही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्या नगरसेवकाला बोलवू का? असे एका रहिवाशाने विचारताच चोरटय़ाने नकार दिला.

Story img Loader