कल्याण, डोंबिवली शहरांतर्गत वर्दळीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालविण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. अशा वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडूनही कारवाई होत नसल्याने अशा बेशिस्त वाहन चालकांना बळ मिळत आहे. कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी दोन वेगळ्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा- ठाणे: उल्लेखनीय कामगिरीबद्दल अंबरनाथच्या जयहिंद बँकेला दोन पुरस्कार
खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश प्रसाद माळी (७१) हे मोहने येथे राहतात. ते पत्नी द्रौपदी (७१) हिच्या बरोबर मोहने येथील मारुती मंदिरा जवळून दोन दिवसांपूर्वी पायी चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकी स्वाराने जगदीश यांची पत्नी द्रौपदी यांना जोराची ठोकर दिली. त्या रस्त्याच्या बाजुला पडल्या. त्यांच्या पायाचे हाड मोडले. वैभव असे दुचाकी स्वाराचे नाव आहे. त्याच्या विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात जगदीश यांनी तक्रार केली आहे.
हेही वाचा- ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
दुसऱ्या एका प्रकरणात, खंबाळपाडा येथे राहणारे मोहम्मद उमर (६०) हे शिळफाटा रस्त्यावरील पिसवली येथे टाटा नाका भागातून रस्ता ओलांडत होते. यावेळी एका ट्रक चालकाने मोहम्मद यांना धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले. मात्र, चालकाने तात्काळ ब्रेक दाबल्याने मोठी दुर्घटना टळली. मोहम्मद यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा- कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी; इमारतीमधील सदनिका खाली करण्याचे पालिकेचे आदेश
अलीकडे शाळांना सुट्टी असल्याने लहान मुले सायकली, दुचाकी घेऊन वर्दळीच्या रस्त्यावर येतात. अनेक मुले हुल्लडबाजी करत रस्त्यावरुन दुचाकी, सायकली चालवतात. त्यामुळे इतर चारचाकी, दुचाकी वाहनांना त्याचा फटका बसत आहे. लहान मुले असल्याने अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करुन वाहने पुढे घेऊन जातात.वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.