डोंबिवली पूर्वमधील मंदिर संस्थानच्या प्रयत्नांना यश; मध्य रेल्वे प्रशासनाची संमती
डोंबिवली पूर्व भागातील नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराला खेटून असलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा (बाग) नव्याने उभारण्याचा निर्णय श्री गणेश मंदिर संस्थानने घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वे मार्गाच्या विस्तारित कामासाठी रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या बैठक व्यवस्थेसाठी निवांत असलेली ही बाग तोडून टाकली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने हा कट्टा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे.
या जागेचा काही भाग रेल्वेच्या हद्दीत येत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सहाव्या आणि सातव्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी बागेचा काही भाग तोडून टाकण्यात आला होता.
नेहरू रस्त्यावर व गणेश मंदिराला लागून हा ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे. १०० बाय ५० फुटांच्या चौकोनी जागेत पूर्वी बसण्यासाठी रिकामे बाकडे होते. मंदिर संस्थानने या चौकोनी पट्टय़ाला संरक्षित भिंत घातली. त्या ठिकाणी शोभेची झाडे लावली. हिरवळीचा गालिचा करून घेतला. या मोकळ्या जागेत दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक मंडळी एकत्र येऊन बसत. आपल्या सुख-दु:खाला मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न करीत असत. या बागेत प्रेमी युगुलांना अजिबात वाव नव्हता. मंदिर संस्थानने या बागेची उत्तम निगा राखली होती. बागेत सकाळ-संध्याकाळ पाणी मारण्यात येत होते. त्यामुळे या भागात सतत गारवा असायचा. संध्याकाळच्या वेळेत शतपावलीसाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ, वृद्ध मंडळी गणपतीचे दर्शन घेऊन थेट या कट्टय़ावर येऊन बैठक मारत असत. काही एका कोपऱ्याला बसून पोथी, स्तोत्र म्हण्यात दंग असत. ज्येष्ठ वर्गातील महिला, पुरुष या कट्टय़ावर नियमित निवांत बसलेले असत. कोणा ज्येष्ठाचा वाढदिवस असेल तर या कट्टय़ावर तो एकत्रितपणे साजरा करण्यात येत होता. या आनंदात सगळे ज्येष्ठ सहभागी होत असत.
रेल्वेने हा कट्टा तोडून टाकल्यानंतर पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, नेहरू मैदान, फडके रस्ता परिसरातील ज्येष्ठ मंडळींना बसण्यासाठी अशी निवांत जागा नव्हती. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंडळी गणेश मंदिर संस्थानकडे ज्येष्ठ नागरिक कट्टा दुरुस्त करण्याची मागणी करीत होते. मंदिर संस्थानने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून, ज्येष्ठ नागरिक कट्टा दुरुस्त करून घेण्याची परवानगी मिळवली आहे. यापुढे हा कट्टा तोडण्यात येणार नाही, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना दिले, असे मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले.
रेल्वे स्थानक भागात ज्येष्ठ नागरिकांना ऊठबस करण्यासाठी जागा नाही. श्री गणेश मंदिराजवळील ज्येष्ठ नागरिक कट्टा हा अनेक ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर होता. संध्याकाळच्या वेळेत घरातून बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घेऊन एक तास बाहेर निवांत बसण्यासाठी कट्टा हे चांगले साधन होते. ते रेल्वेकडून तोडण्यात आल्याने ज्येष्ठांची गैरसोय झाली होती. रेल्वे प्रशासनाकडे तगादा लागून कट्टा पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वेने या कामाला मंजुरी दिली आहे.
– प्रवीण दुधे, विश्वस्त, श्री गणेश मंदिर संस्थान