ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत, त्यांची बोळवण करणारे महापौर, उपमहापौर आणि पालिका आयुक्त यांच्या कारभाराविषयी ज्येष्ठ नागरिक महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिका निवडणुका आल्या की, ज्येष्ठ नागरिकांना आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या राजकीय नेते आणि उमेदवारांच्या पाठीमागे ज्येष्ठ नागरिकांनी वाहवत जाऊ नये. आपल्या भूमिकेशी ठाम राहून मतदान करावे. याविषयी विचारविनिमय करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाची सोमवारी बैठक आयोजित केली आहे.
ऑगस्ट २०१२ मध्ये ज्येष्ठ नागरिक महासंघाने कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या अकरा मागण्यांचे निवेदन दिले होते. तत्कालीन आयुक्तांनी यामधील काही मागण्या मान्य केल्या होत्या. उर्वरित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी गेल्या तीन वर्षांपासून पालिकेत हेलपाटे मारीत आहेत. त्यांना आयुक्त, महापौर, उपमहापौर व अन्य एकही पदाधिकाऱ्याने दाद दिली नाही. पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असल्याने विनाविलंब महासंघाच्या मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना होती. याऊलट, या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात पदाधिकाऱ्यांनी धन्यता मानली, असे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अध्यक्ष रमेश पारखे यांनी सांगितले.
‘फेस्कॉम’चे डोंबिवलीत दोन वर्षांपूर्वी अधिवेशन झाले. त्यावेळी शिवसेनेच्या तत्कालीन महापौर, आयुक्तांना आमंत्रित करण्यात आले होते. ‘आम्ही कार्यक्रमाला येतो’ असे आश्वासन देऊनही या दोघांनी आयत्या वेळी कार्यक्रमाला दांडी मारून कार्यक्रमाची शोभा केली, अशी टीका पारखे यांनी केली. निवडणुका आल्या की, राजकीय नेते, पदाधिकारी, उमेदवारांना ज्येष्ठ नागरिकांची मते दिसतात. पालिकेने ज्येष्ठ नागरिकांची गेली तीन र्वष जी उपेक्षा केली. त्याची परतफेड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कुणीही ज्येष्ठ नागरिकाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागे वाहवत जाऊ नये. आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून जाणत्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात येणार आहे, असे ‘फेस्कॉम’चे अध्यक्ष रमेश पारखे यांनी सांगितले.
ज्येष्ठांच्या मागण्या
’डोंबिवलीतील आंबेडकर सभागृह, बालभवन ज्येष्ठ नागरिकांना कार्यक्रमासाठी ५० टक्के सवलतीत देण्यात यावे. ही मागणी प्रशासनाने मान्य केली होती. या मागणीची अंमलबजावणी प्रशासनाने करावी
’पिंपरी-चिंचवड पालिकेप्रमाणे कडोंमपाने ज्येष्ठांसाठी २५० रुपये वैद्यकीय विमा सुरू करावा.
’पदपथ फेरीवाला मुक्त करण्यात यावेत.
’मुख्य रस्ते, वर्दळीच्या रस्त्यांवर प्रसाधनगृह उभारावीत.
’पालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष असावा.
’ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठ नागरिक छळ दिन व स्मृतिभ्रंश दिन पालिकेतर्फे साजरे करण्यात यावेत. गुणवंत ज्येष्ठांचा सन्मान करण्यात यावा.
ज्येष्ठ नागरिकांना वयोमानाप्रमाणे अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून पालिकेकडे तीन वर्षांपूर्वी काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य कराव्यात म्हणून तीन र्वष पालिकेत फेऱ्या मारल्या. महापौर, उपमहापौरांना भेटलो. आयुक्तांच्या भेटी घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांना पालिकेने केराची टोपली दाखवली. निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी राजकीय पक्षांच्या मागे फरफटत जाऊ नये. म्हणून सोमवारी बैठकीचे आयोजन केले आहे.
– रमेश पारखे, अध्यक्ष, (ज्येष्ठ नागरिक महासंघ)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा