ठाणे – बदलापूर येथील आदर्श शाळेत झालेल्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घटनेचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूर येथे मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
बदलापूर येथे झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची, शाळेची कमिटी, शाळेचे प्राचार्य यांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत असून त्याचा प्राथमिक अहवाल घेण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. ही घटना १३ ऑगस्ट च्या आसपास घडली असून या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. शाळेच्या विरोधात सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. तर कायदा ठरवेल कोणती शिक्षा द्यायची. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविली जाणार. यासाठी चांगला वकीलही देण्यात येणार असून या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून डॉक्टर, पोलीस यांच्याकडून दिरंगाई झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल. शिक्षणमंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की, विद्यार्थी हेच माझे अंतिम ध्येय असून कोणत्याही विद्यार्थ्यास काही झाले तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मग ते शाळेचे प्राचार्य असो किंवा संचालक सर्वांना परिणाम भोगावे लागतील, असे ही केसरकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा >>>अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांना हटवले, तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग केला मोकळा
पालकांना भेटणार
बुधवार २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४.०० वाजता विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटायला जाणार आहे. त्यावेळी पालकांनी आपले जे काही म्हणणे आहे ते मला सांगावे. त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. तर पीडितांच्या पालकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यांना न्याय दिला जाईल. असे केसरकर यांनी स्पष्ट केले.