लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच, येथील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी भाजपचे डोंबिवली विधानसभेचे उमदेवार रवींद्र चव्हाण यांना समर्थन दिले. त्यानंतर पाठोपाठ मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत आपल्या समर्थकांसह प्रवेश करून स्वताच्या राजकीय प्रवासातील संभ्रमाला पूर्ण विराम दिला.
थरवळ यांनी दूरदृष्टीचा विचार करून हे निर्णय घेतले असल्याची चर्चा आहे. सदानंद थरवळ हे शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. ४४ वर्ष त्यांनी डोंबिवलीत शिवसेनेचे निष्ठेने काम केले. सामान्य शिवसैनिक ते शहरप्रमुख, माजी नगरसेवक-जिल्हाप्रमुख अशी मानाची पदे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मिळाली. त्यामुळे शिवसेनेवरील आपली निष्ठा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावरही ढळू दिली नाही. त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले.
आणखी वाचा-ठाणे : घोडबंदरमध्ये तीन दिवस अवजड वाहतुक बंद
ठाकरे गटाकडून त्यांना कल्याण जिल्हाप्रमुखपद देण्यात आले होते. अनेक वर्ष डोंबिवलीत शिवसेनेच्या माध्यमातून कार्य केले असल्याने यंदाच्या विधानसभेसाठी ते इच्छुक होते. पण त्याऐवजी दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज थरवळ यांनी ठाकरे गटातून बाहेर पडणे पसंत केले.
आपण मूळ डोंबिवली निवासी आहोत. या शहाराशी आपली घट्ट नाळ आहे. डोंबिवली, कल्याण शहर विकासात महत्वाची भूमिका घेणाऱ्यांना आपले पाठबळ असेल, अशी भूमिका मागच्या दोन महिन्याच्या कालावधीत थरवळ यांनी घेतली होती. सत्तेशिवाय या गोष्टी होणार नसल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी भाजपचे डोंबिवलीतील उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांना समर्थन दिले. त्यानंतर पाठोपाठ शिंदेसेनेकडून मिळालेल्या निमंत्रणानुसार थरवळ यांनी आपल्या ४५ हून अधिक पदाधिकाऱ्यांसह वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये खा. डॉ. शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत मद्य, गांजा सेवन करून रस्त्यावर गैरशिस्तीने वागणाऱ्या तीन जणांवर गुन्हे
थरवळ यांच्या सोबत त्याचे पुत्र अभिजीत थरवळ, प्रतिमा शिरोडकर, साधना माळवी, शुभांगी शानभाग, लक्ष्मीकांत अंबरकर, कुणाल शहा, विजय घरत, कमलाकर देसाई, निखील वाणी अशा ४५ हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
थरवळ मुळचे निष्ठावान शिवसैनिक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण डोंबिवली परिसरात विकास कामांचे जे पहाड उभे केले आहेत, ते पाहून आणि अशाच प्रकारची इतरही कामे या शहरात यापुढे झाली पाहिजेत हा विकासाचा विचार करून थरवळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. -गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना.
ठाकरे गटात अडीच वर्षात आपला भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण, डोंबिवली शहरात जी विकासाची कामे केलीत आणि प्रगतीच्या वाटेवर या शहराला नेण्याचा प्रयत्न केला आहे. शहर विकास हा विषय समोर ठेऊन आपण शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. -सदानंद थरवळ, ज्येष्ठ शिवसैनिक, शिंदे शिवसेना.