ठाणे : मुंबई नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. शुक्रवारी भिवंडी येथील पिंपळास भागात या रस्त्याला जोडणाऱ्या सेवा रस्त्याचा २८ मीटर लांबीचा भाग खचला. या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. पावसामुळे भूस्खलन झाल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.
मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळासफाटा भागात नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील सेवा रस्त्याचा भाग शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक खचला. मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या निर्माणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि वाहतुक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात टाळण्यासाठी खचलेल्या रस्त्याभोवती अडथळे बसविण्यात आले आहेत.
परंतु या घटनेमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. रस्त्याचे काम सुरू असून भूस्खलन झाल्याने रस्त्याचा भाग खचल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर वाहन चालकांकडून कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.