कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाटाने ठेकेदारांनी कान टवकारले आहेत. बऱ्यात दिवसांपासूनची बिले अद्याप पदरात न पडल्याने नव्या विकासकामांना हात घालण्यास कंत्राटदार तयार नसल्याने निविदांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळलेला नाही. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने कामांतील टक्केवारीही वाढली आहे. परिणामी विकासकामे रखडत असल्याचा सूर पालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी लावला आहे.
एखाद्या कामाच्या वारंवार निविदा काढूनही त्याला कोणीही ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याचे महापालिकेतील अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. विकासकामे रखडण्यामागे वाढलेली टक्केवारी हे मोठे कारण असल्याचे सांगण्यात येते.
येत्या सहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मोठय़ा प्रमाणावर कामे काढण्याकडे सत्ताधारी पक्षासह विरोधी बाकांवरील नगरसेवकांचाही कल आहे. या कामामधून मिळणारा मलिदा पुढे निवडणुकीत कामी पडणार असल्याने अव्वाच्या सव्वा दराने कामे काढण्याची लगबग महापालिकेत सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीने सुमारे ५०० कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याचे प्रकरण अजूनही गाजत आहे.
या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निविदांना ठेकेदारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी एका विभागात दीड टक्के खिरापत वाटावी लागते. अशा प्रकारे सुमारे १३ ते १४ टक्क्य़ांचा दौजतजादा केल्याशिवाय कामे पदरात पडत नाहीत, अशी महापालिका वर्तुळात जाहीर चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढले आहे.   
कामाच्या रकमेतील निम्मी रक्कम टक्केवारीत जाते. त्यामुळे प्रत्यक्षात कामाच्या माध्यमातून फारसे काही हाती लागत नसल्याची तक्रार काही ठेकेदार दबक्या सुरात करू लागले आहेत. येत्या सहा महिन्यांत पालिकेच्या निवडणुका लागतील. या कालावधीत विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक, नेत्यांकडून सतत रेटा लावण्यात येईल. निवडणुकीच्या कालावधीत केलेल्या कामाची देयके काढणे मुश्कील होऊन जाईल.
गेल्या पाच वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्व भागात निवडणुकीपूर्वी एका ठेकेदाराने दोन रात्रीत मानपाडा रस्ता तयार करून दिला. शिवसेना नेते, पदाधिकारी खूश झाले. परंतु नंतर या ठेकेदाराला त्याच्या कामाचे देयक काढताना ब्रह्मांड आठवले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्याने या ठेकेदाराचे देयक काढण्यासाठी मातोश्रीपर्यंत हा विषय नेण्यात आला होता. असा अनुभव एका ठेकेदाराने
कथन केला.
दरम्यान, यासंदर्भात माहितीसाठी आयुक्त मधुकर अर्दड यांच्या भ्रमणध्वनीवर, कार्यालयात संपर्क साधला ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. पालिका पदाधिकारी या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.  
* सिमेंट रस्ते वेगाने होण्यासाठी रस्त्यालगतची सेवा वाहिन्यांची कामे करण्यासाठी पाच वेळा निविदा.
*  कल्याण पूर्वमधील स्कायवॉकच्या कामासाठी पाच वेळा निविदा.
* ठाकुर्ली रेल्वेजवळील उड्डाण पुलासाठी तीन वेळा निविदा.
* अत्यंत चढय़ा दराने ठेकेदारांचा निविदांना प्रतिसाद.
* संगणक विभागातील नगररचना विभागात राबवण्यात येणारी ‘ऑटोडीसीआर’ प्रणाली गेल्या दीड वर्षांपासून चर्चेच्या भोवऱ्यात.
* मल उदंचन केंद्राची कामे सहा वर्षांपासून सुरू.
* मोहने-आंबिवली उड्डाण पूल ठेकेदाराला पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने रखडपट्टी.
* झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अनेक कामे ठेकेदारांनी कामे थांबवल्याने ठप्प.
भगवान मंडलिक, कल्याण

Story img Loader