ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते व कळवा मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आव्हाड यांना धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे.
कळवा मुंब्रा हा परिसर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदार संघातील खारेगाव परिसरातून अभिजित पवार हे महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले असून आव्हाड यांचा निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्याचबरोबर ठाणे शहरातील खोपट परिसरातून हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमा वाणी हे महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. ते सुद्धा आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आव्हाड यांच्यावर टीका करणाऱ्यांना मारहाण केल्याचाही त्यांच्यावर आरोप असून या मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर दोघांवर तडीपारची कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर ठाण्यात दोन गट पडले. शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांना रामराम करत अजित पवार यांना साथ दिली होती. त्यावेळीही अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे दोघे आव्हाड यांच्यासोबत उभे राहिले होते. मुल्ला यांनी आव्हाड यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. या निवडणूकीतही अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे दोघे आव्हाड यांचे काम केले होते. या दोन्ही खंद्या समर्थकांनी आव्हाड यांना रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी पक्ष प्रवेश केला.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला असून या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आव्हाड यांना धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे.