शहापूर : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या भव्य चैतन्य दवे यांच्यासह सात जणांना शहापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर येथील परिवार गार्डन हॉटेलच्या एका रूममध्ये ऑनलाइन सट्टा खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा खेळण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये पोलिसांची करडी नजर असते. यामुळे सट्टेबाजांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळण्यासाठी भव्य चैतन्य दवे ( २५ ) याने मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर जवळील परिवार गार्डन हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. तो मुंबईतील दहिसर भागात राहतो. हॉटेलच्या खोलीतून दवे त्याच्या मोबाईलवरून विविध ओळखपत्रांच्या माध्यमातून अन्य सट्टेबाजांसोबत बेकायदेशीर ऑनलाइन सट्टा खेळत होता. याबाबत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून दवे याला अटक केली.
हेही वाचा – विश्लेषण : कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेची प्रतीक्षा केव्हा पूर्ण होणार?
या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाविस्कर, त्यांचे सहकारी शशी पाटील, विकास सानप, दत्तात्रय भोईर यांचा समावेश होता. दवे याने चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी सहाजणांना अटक केली आहे. या कारवाईत बनावट नावाने असलेले सिमकार्ड, मोबाईल यावेळी जप्त करण्यात आले आहे. तसेच या सट्ट्यामध्ये सहभागी असलेल्यांचा पोलीस माग काढत आहेत. दरम्यान, क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या या सट्टेबाजांची मोठी साखळी कार्यरत असून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली धाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.