लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : डोंबिवली जवळील पिसवली गावात पिंगारा बार परिसरात शुक्रवारी दुपारी विजेचा जिवंत प्रवाह गाई, म्हशी बांधलेल्या गोठ्यात प्रवाहित होऊन सात गाई, म्हशींचा आणि त्यांच्या वासरांचा जागीच मृत्यू झाला. दुभत्या गाई, म्हशींचा मृत्यू झाल्याने गोधन मालकासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिसवली येथे मलिक यादव यांचा गाई, म्हशींचा गोठा आहे. या गोठ्या जवळ बदामाची मोठी झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या गावातून गेलेल्या विजेच्या खांबांवरील जिवंत वीज वाहिन्यांना स्पर्श करत होत्या. या फांद्या तुटून जीवंत वीज वाहिनीवर पडल्या तर वीज वाहिनी तुटण्याची शक्यता होती. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वीज पुरवठा बंद करून मलिक यादव यांच्या गोठ्या जवळील वीज वाहिनीला स्पर्श करणारी बदामाच्या झाडाची फांदी तोडली. अशाचप्रकारे पिसवली भागातील वीज वाहिनीला स्पर्श करणाऱ्या फांद्या कर्मचाऱ्यांनी तोडल्या.

आणखी वाचा-ठाणेकर कोंडीच्या चक्रव्यूहात इंधन खर्च, वेळेच्या अपव्ययामुळे नागरिक हैराण

झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू केला. त्यावेळी जिवंत वीज वाहिनीतून वीज प्रवाह गोठ्याच्या छताच्या लोखंडी पाईप मधून प्रवाहित झाला. हा प्रवाह गोठ्यात प्रवाहित झाल्याने त्याचा धक्का गोठ्यात बांधलेल्या तीन गाभण म्हशी, त्यांची दोन पारडू (वासरे), एक गाय आणि गायीचे वासरू यांना बसला.

धक्का बसताच हे गोधन जागीच मरण पावले. काही वेळाने गोधन मालक गोठ्यात आला. त्यावेळी त्यांना धक्का बसला. गोठ्यातील सर्व जनावरे मेली होती. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप गोधन मालक यादव यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven cow and buffaloes died due to lightning in pisvali near dombivli mrj