शहापूर – मुंबई नाशिक महामार्गावर सोमवारी सकाळी ट्रेलर उलटून त्यामधील यंत्र मोटार आणि एका दुचाकीवर पडले. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
हेही वाचा >>> नऊ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव येथील घटना
अक्षदा पाटील, रविंद्र पाटील, आराधना पाटील, पूजा भोसले, प्रमोद भोसले, तनीषा भोसले, बंधू तिवरे अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने ट्रेलर वाहतूक करत होता. ट्रेलरमध्ये लोखंडी यंत्र होते. हा ट्रेलर सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आसनगाव पुलाजवळ आला असता, वाहन चालकाने नियंत्रण सुटले आणि ट्रेलर उलटला. या घटनेत ट्रेलर मधील यंत्र येथील मोटार आणि दुचाकीवर पडले. त्यामुळे मोटारीतील अक्षदा पाटील, रविंद्र पाटील, आराधना पाटील, पूजा भोसले, प्रमोद भोसले, तनीषा भोसले जखमी झाले. हे सर्व एकाच कुटूंबातील असून ते मुंबईतील मलबार हील भागात राहतात. तर दुचाकी चालक बंधू तिवरे हे शहापूर भागात राहत असून ते देखील जखमी झाले. या प्रकरणी निष्काळजीपणे ट्रेलर चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.