लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : येथील पश्चिमेतील योगीधाम आजमेरा हाईट्स गृहसंकुलातील मराठी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल प्रकरणातील शासकीय सेवेतील पर्यटन अधिकारी (निलंबित) अखिलेश शुक्ला यांच्यासह सात जणांना रविवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याप्रकरणात अखिलेश शुक्ला यांच्यासह त्यांची पत्नी गीता शुक्ला, सुमित जाधव, दर्शन बोराडे यांच्यासह सात जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. त्यानंतर पु्न्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रविवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आणखी वाचा-डोंबिवलीत देवीचापाडा येथे पडदे लावून बेकायदा चाळीची उभारणी, राजकीय दबावामुळे कारवाईत अडथळा
यावेळी न्यायालयाने मारेकऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे हे सर्व मारेकरी आधारवाडी कारागृहात नेण्यात आले. शुक्ला हे राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळात व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. अलीकडेच विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्ला यांच्या निलंबनाची घोषणा केली.
आजमेरा हाईट्स गृहसंकुलात लता कळवीकट्टे या शुक्ला यांच्या शेजारी राहतात. लता या घरात धूप अगरबत्ती लावत असल्याने धूर होत होता. या त्रासामुळे अखिलेश शुक्ला आणि लता यांच्यात वाद होत होते. काही दिवसापूर्वी धूप अगरबत्ती लावण्यावरून लता कळवीकट्टे आणि शुक्ला कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादातून शुक्ला यांनी लता कळवीकट्टे यांना, ‘तुम्ही मराठी लोक घाणेरडे असता. मटणमांस खाता. मराठी माणसे आपल्यासमोर झाडू मारतात. आपण मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आणू तर तुमचे मराठीपण कुठल्या कुठे जाईल,’ असे बोलून लता यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. याविषयावरून शुक्ला यांचे आणखी एक शेजारी घराबाहेर आले. त्यांनी तुमच्यातील वाद शांतपणे मिटवा पण सरसकट तुम्ही मराठी लोकांना उगाच बोल लावू नका, असे शुक्ला यांना सांगितले.
आणखी वाचा-डोंबिवलीत रिजन्सी, गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानीने भाडेवाढ
धीरज देशमुख यांच्या बोलण्याचा राग येऊन अखिलेश शुक्ला यांनी बाहेरून आठ जणांना बोलावून घेतले. आलेल्या मारेकऱ्यांनी धीरज देशमुख, त्यांचा भाऊ अभिजित आणि लता यांना मारहाण केली. अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. या वादाला नंतर मराठी विरुध्द परप्रांतीय असे स्वरूप आले. नागपूरच्या विधीमंडळात हा विषय चर्चेला गेला. शिवसेना आमदार ॲड. अनिल परब यांच्यासह अनेक आमदारांनी हा विषय विधीमंडळात उपस्थित करून शुक्ला यांच्यावर कारवाईची मागणी केली. या मागणीप्रमाणे शुक्ला यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले. शुक्ला यांच्या खासगी वाहनावरील अंबर दिवा आरटीओने जप्त केला आहे. या दिव्याचा नियमबाह्य वापर केला म्हणून त्यांना नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.