डोंबिवली – ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील सागाव भागातील चेरानगर परिसरात राहत असलेल्या एका ३२ वर्षाच्या नोकरदाराची एका भामट्याने १७ लाख १३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन महिन्याच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.आपण ऑनलाईन माध्यमातूून गुंतवणूक केली तर आपणास झटपट वाढीव परतावा मिळेल. तसेच आपली गुंतवणूक चक्रवाढ व्याज पध्दतीने वाढत जाईल, असे भामट्याने या प्रकरणात फसवणूक झालेल्या जाफरआलम अहमद या नोकरदाराला सांगितले. अल्पावधीत अधिकची रक्कम मिळते म्हणून जाफरआलम यांनी भामटा सांगेल त्याप्रमाणे आपल्या बँक खात्यामधून टप्प्याने भामट्याच्या बँक खात्यात रक्कम वळती करू लागले. एप्रिलपासून ते जूनपर्यंत भामट्याने तक्रारदार जाफरआलम यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाने १७ लाख १३ हजार रूपये वसूल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रकमेवर आपणास वाढीव परतावा देण्यात यावा म्हणून जाफरआलम यांनी भामट्याकडे तगादा लावला. सुरूवातीला त्याने वाढीव परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच तुमच्या बँक खात्यात थेट परतावा जमा होईल असे सांगण्यास सुरूवात केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन जाफरआलम गुंतवणूक करत राहिले. नंतर भामट्याने जाफरआलम यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ सुरूवात केली. त्यांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपली मूळ रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी जाफरआलम करू लागले, पण भामटा त्यास दाद देत नव्हता.आपली फसवणूक भामट्याने केली आहे हे लक्षात आल्यावर जाफरआलम यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventeen lakh fraud of an employee at sagaon in dombivli amy
Show comments