कल्याण- ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपचे भिवंडीचे खासदार, केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक कथोरे यांचे खच्चीकरण करण्यासाठी खासदार पाटील गटाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पाटील समर्थक भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांनी भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांना भाजपच्या जिल्हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मधुन बाहेर काढल्याने कथोरे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाटील, कथोरे यांच्यामधील वाद इतका टोकाला पोहचला आहे की भाजपचे कार्यक्रम असुनही दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये पाऊल ठेवत नाहीत. खा. पाटील आगरी समाजातील, तर कथोरे कुणबी समाजातील. या जातीचा आधार घेऊन भिवंडी, शहापूर, मुरबाड भागात कथोरे, पाटील गट तयार झाले आहेत. विकास कामांच्या माध्यमातून कथोरे आपले सामर्थ्य अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय मंत्री पाटील भाजपच्या वरिष्ठांचे पाठबळ आणि मंत्रीपद अधिकाराचा वापर करुन कथोरे यांना जागोजागी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चर्चेतून कळते.

हेही वाचा >>>ठाण्यात शरद पवार गटाने भुजबळांचा तर, अजित पवार गटाने आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

शहापूर, मुरबाड हा कुणबी समाजाची अधिकची लोकसंख्या असलेला भाग. भिवंडी परिसरात आगरी, कुणबी समाजाची वस्ती आहे. या पट्ट्यात कथोरे यांनी बस्तान बसविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कथोरे यांना फडणवीस सरकार काळापासून मंत्री पदाने हुलकावणी दिली. शिंदे सरकारच्या काळात ही संधी हुकली. कथोरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. जागृत झालेल्या मंत्री पाटील यांनी कथोरे यांना विविध माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कथोरे यांना राष्ट्रवादीमधून भाजपत आलेल्या जुन्याजाणत्यांची साथ आहे. कथोरे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मधुकर मोहपे यांना पाटील यांनी भिवंडी लोकसभा प्रमुख, ठाणे जिल्हा भाजपचे ग्रामीण अध्यक्षपद दिले आहे. मागील तीन वर्ष पक्षात सक्रिय नसलेले मोहपे यांना अचानक बढती देण्यात आल्याने भाजपमधील एक गट नाराज आहे. कथोरे यांना मुरबाड, कल्याण, शहापूर पट्ट्यात शह देण्यासाठी पाटील यांनी ही खेळी केली आहे. कथोरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा व्हाॅट्सप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये पालघर, ठाणे, शहापूर, मुरबाड , कल्याण भागातील कार्यकर्त्याचा समावेश होता. या ग्रुपचा ताबा जिल्हाध्यक्ष मोहपे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी कथोरे समर्थकांना काढुन टाकण्याचा सपाटा लावला आहे. भाजपचे अरुण पाटील, रवींद्र चंदे, सुधीर तेलवणे, रवीद्र घोडविंदे, नितीन मोहपे, राजेश पाटील यांना त्याचा फटका बसला आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाळला भुजबळांचा पुतळा

“ठाणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष असताना कथोरे यांच्या काळात विविध भागातील कार्यकर्ते, व्यक्तिंना जिल्हा भाजपच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले होते. या ग्रुपचे प्रमुख अनेक होते. यामध्ये नीलेश सांबरे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते होते. भाजप ग्रुपमध्ये सुरू असलेली चर्चा, पक्षांतर्गत गोष्टी सांबरे गटाला कळत होत्या. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. कथोरे समर्थकांना धक्काही लावण्यात आला नाही.”-मधुकर मोहपे, अध्यक्ष,भाजप ठाणे जिल्हा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Several supporters are upset with bjp district president mohpe for removing whatsapp group kalyan amy
Show comments