नालासोपारा पूर्वेतील महामार्गालगतच्या वस्त्यांमधील पाणीसमस्या बिकट
कीर्ती केसरकर, विरार
नालासोपारा पूर्वेकडील महामार्गालगतच्या वसाहतींना पिण्याचे पाणी नसल्याने ते गळती असलेल्या जलवाहिनीतील पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. जलवाहिनीचे पाणी गळून एका डबक्यात जमा होत असून तेथून रहिवासी पाणी भरत आहेत. हे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याशिवाय पाणी भरण्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालून या खड्डय़ात उतरावे लागत आहे.
नालासोपारा पूर्वेला महामार्गाजवळ असलेल्या अनेक वसाहती अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणीही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. भक्तिधाम या परिसरातील स्थानिक रहिवाशांना बोरिंगचे पाणी पुरवले जाते. हे पाणी अतिशय अस्वच्छ आणि गढूळ असल्याने नागरिकांना ते पिण्यासाठी वापरता येत नाही. या परिसरापासून थोडय़ाच अंतरावर महापालिकेची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीमधील पाणी सतत गळत असते. ही जलवाहिनी जेथून जाते, तिथे मोठा खड्डा तयार झाला असून या खड्डय़ात पाणी जमा होते. पिण्याच्या पाण्यासाठी रहिवासी या खड्डय़ात उतरतात आणि जलवाहिनीला कपडा बांधून गळणारे पाणी पिण्यासाठी नेतात. काही जण या डबक्यात साचलेले पाणीच नेत असल्याचे दिसून आले आहे.
रस्त्याच्या कडेला असलेली ही जलवाहिनी एका उघडय़ा पुलाखाली आहे. मात्र रहिवाशांचा नाइलाज असल्याने ते येथूनच पाणी भरत असतात. महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असतो, त्या दिवशी जलवाहिनीमधूनही पाणी गळत नाही. त्या दिवशी अनेक रहिवासी पाण्याच्या बाटल्या घेतात. मात्र त्या महाग असल्याने सर्वच रहिवाशांना परवडत नाही. त्या दिवशी पाण्याविना रहिवाशांचे प्रचंड हाल होतात. या पुलाखालील या जलवाहिनीकडे जाणारा मार्ग अतिशय निसरडा असून पाय घसरून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
या परिसरातील रहिवाशांनी आधी घरपट्टी भरावी. त्यानंतर नळजोडणीसाठी अर्ज केले, तर नळजोडणी दिली जाईल. त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– नीलेश देखमुख, सभापती, नालासोपारा प्रभाग समिती ‘ब’
गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच प्रकारे पाणी भरतो. जीवघेणे असले तरी पिण्यासाठी पाणी तर हवेच. सकाळी दोन फेऱ्या आणि संध्याकाळी दोन फेऱ्या मारून पाणी भरावे लागते.
– सुषमा झा, स्थानिक रहिवासी
पाणी नसल्याने पूर्वी पाण्याच्या बाटल्या घ्यायचो. मात्र त्या महाग पडत आहेत. लहान मुलांना घेऊन पाणी भरायला जातो. पाणी भरून वर मुलांकडे देतो. दुसरा पर्याय नाही.
– अग्नी दुबे, स्थानिक रहिवासी