कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावी, आदिवासी पाड्यांच्या हद्दीत पाण्याचे डोह, ओहाळ वाहत असतात. या पाण्याचा गावकरी आंघोळीचे पाणी, गाई, म्हशी, बैल, वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात. गेल्या महिन्यापासून ठाणे जिल्ह्यातील कडक ऊन, अधिकच्या बाष्पीभवनामुळे गावोगावचे पाण्याने भरलेले डोह आणि ओहाळ आटले आहेत. त्यामुळे पशुधनाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गाव परिसरातील पाण्याचे डोह (तलास सदृश्य खोल खड्डे) गावकऱ्यांना मोठा दिलासा असतो. वर्षानुवर्ष गावकरी या पाण्याचा वापर आंघोळीचे पाणी, घरातील गाई, म्हशी, बैल, वासरांच्या पिण्यासाठी वापर करतात. गावांमध्ये अनेक जण म्हशी पालनाचा व्यवसाय करतात. या दुग्ध उत्पादनावर अनेक कुटुंब अवलंबून असतात. अशा पशुपालकांना पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी गावचे डोह, ओहाळ मोठा आधार असतात.
हेही वाचा…ठाकरे यांच्या ‘मशाल चिन्हा’चे बूथ लावल्याने दोघांना मारहाण
हे डोह पावसाच्या पाण्यात भरून राहतात. या डोहांना अनेक ठिकाणी नैसर्गिक झरे आहेत. काही डोह पावसाच्या पाण्याने भरलेले असतात. गेल्या काही दिवसांपासून उष्णतापमान वाढत आहे. तलाव, धरणे, डोहांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पाणवठ्यांमधील पाणी आटू लागले आहे.
गावालगतच्या या पाणवठयावर अनेक ग्रामस्थ भाजीपाला लागवड करत होते. पाणवठे आटल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. भाजीपाल्यासाठी पाण्याची सुविधा नसल्याने लागवड सुकून गेली आहे. गावालगतचे डोह, ओहाळ आटल्याने ग्रामस्थांना ट्रॅक्टर ट्रॉलीवरील टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागते. तीन हजार लिटर विकतच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दोन ते अडीच हजार रूपये मोजावे लागतात. गावातील २५ ते ५० लोक एकत्र येऊन अशाप्रकारे पाण्याची तहान भागविण्याचा प्रयत्न करत आहेत.
गावोगावच्या कुपनलिका भूजल पातळी खाली गेल्याने पाणी देईनाशा झाल्या आहेत. काही गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना आहेत. या नळ योजनेला ज्या धरणांमधून पाणी येते. त्या धरणांनी तळ गाठल्याने अनेक गावांना नळाव्दारे आठवड्यातून एक ते दोन वेळा पाणी मिळते.
शहापूर, मुरबाड ग्रामीण, आदिवासी पाड्यांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती भीषण आहे. जलजीवन योजनेचे आराखडे फक्त शासनाकडून कागदोपत्री तयार केले जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. उन्हाच्या फुफाट्यात ग्रामस्थांना विशेषता महिलांना डोक्यावर हंडे, घागरी घेऊन तीन ते चार किलोमीटरच्या तलाव, विहिरींवरून पाणी आणावे लागते.
हेही वाचा…कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन उलटले, कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
वर्षानुवर्ष ठाणे जिल्ह्यात पाणी टँकर गट प्रभावी आहे. या गटाला काही राजकीय मंडळींचे आशीर्वाद आहेत. गावोगावच्या पाणी योजना सुरळीत राहिल्या तर टँकर गटाला विचारील कोण या विचारातून या गटाकडून गावच्या पाणी योजना निकृष्ट पध्दतीने बांधून त्या लवकर कशा बंद पडतील, या दृष्टीने हालचाली केल्या जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.