जावसई धरणातील पाणीसाठा वापराविना पडून; डागडुजी केल्यास दररोज दोन दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा शक्य
अत्यंत मर्यादित जलसाठे आणि सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना पुरेसा पाणीपुरवठा कसा करावा, याबाबत सर्व संबंधित प्राधिकरणे आता चिंतेत असली तरी उपलब्ध स्रोतांवर योजना राबविण्यात मध्यंतरीच्या काळात झालेल्या कमालीच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. नवे मोठे धरण प्रकल्प राबविण्याच्या हव्यासापोटी अस्तित्वात असलेल्या छोटय़ा धरणांकडे मध्यंतरीच्या काळात चक्क डोळेझाक करण्यात आली. त्यामुळे आता पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असूनही अनेक पाणवठे दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. अंबरनाथमधील जावसई गावात असेच एक धरण चक्क वापराविना पडून आहे. डागडुजी करून वापरता आले तर या धरणातून दररोज दोन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होऊ शकतो, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात अंबरनाथ-बदलापूर परिसरात पाटबंधारे विभागाने चिखलोली, भोज ही धरणे बांधली. त्याच काळात जावसई गावालगतचे हे धरणही बांधले. या धरणातील पाण्याचा वापर पूर्वी जावसई गावातील शेतकरी शेतीसाठी करीत होते. धरणामुळे मोठय़ा प्रमाणात जलसंधारण होऊन जावसई गावातील विहिरींतून बारमाही पाणीही मिळत होते. कालांतराने गळतीच्या कारणाने या धरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र विशेष म्हणजे या धरणाची निश्चित माहिती पाटबंधारे विभागाकडेही उपलब्ध नाही. धरण गळत असल्याचे सांगितले जात असले तरी आता मार्चअखेरीसही धरणात मुबलक पाणीसाठा आहे. आयुध निर्माणी कारखाना आणि वसाहतीच्या पलीकडे हे धरण आहे. धरणाच्या खालच्या भागात जावसई गाव असून अंबरनाथमधील ही एक टंचाईग्रस्त वसाहत आहे. धरणाच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते जर वापरात आणले तर किमान २५ ते ३० हजार कुटुंबांना या धरणातून पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. किमान ३० ते ४० वर्षे हे धरण असेच दुर्लक्षित आहे. त्यामुळे त्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साठला आहे. तो गाळ उपसला तर निश्चितच धरणातील जलसाठा वाढू शकेल. चिखलोली धरण पालिकेने पाटबंधारे विभागाकडून ताब्यात घेतले. तिथून सध्या अंबरनाथला दररोज सात दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. भोज धरणातून बदलापूरला पाणीपुरवठा केला जाणार आहे. जावसई गावालगत असलेल्या या दुर्लक्षित धरणाची डागडुजी आणि साफसफाई केली तर निश्चितच किमान दोन दशलक्ष लिटर पाणी शहरातील पश्चिम विभागाला होऊ शकेल, असेही जल व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
जलयुक्त शिवार योजनेत अशा प्रकारचे दुर्लक्षित जलस्रोत शोधण्याची मोहीम जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या जावसई गावालगत असलेल्या या धरणाची तातडीने पाहणी करून तेथील पाणी उपयोगात आणले जाईल.
सुभाष वाघमारे, अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे विभाग.

Story img Loader