कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्यावरील पिसवली येथील देशमुख होम्स गृहसंकुलात अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न आहे. आता मुसळधार पाऊस पडत असुनही या गृहसंकुलातील रहिवाशांना दिवशभर पुरेल इतकेही पाणी येत नसल्याने रहिवासी संतप्त आहेत. शुक्रवारी संध्याकाळी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी कल्याण-शिळफाटा रस्त्यावर आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आंदोलनामुळे शिळफाटा रस्त्यावर काही वेळ वाहन कोंडी झाली होती. देशमुख होम्स संकुलातील १९ इमारतींमध्ये तेराशे कुटुंब राहतात. गेल्या सहा वर्षापासून या संकुलाला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. येथील रहिवाशांनी वेळोवेळी एमआयडीसी, पालिका प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. तात्पुरता पाणी पुरवठा सुरळीत केला जातो. पुन्हा काही दिवसांनी कमी दाबाने पाणी येण्यास सुरुवात होते. आता दिवसभर पुरेल इतकेही पाणी येत नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून येथील रहिवासी सतत पाण्यासाठी आंदोलने करत आहेत. गेल्या महिन्यात रहिवाशांनी उपोषण केले होते. संकुलाला काटई नाका येथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. देशमुख होम्सपर्यंत हे पाणी येईपर्यंत मध्ये असलेल्या काही संकुलातील रहिवासी पाणी खेचून घेतात. अनेक बेकायदा नळ जोडण्या या जलवाहिनीवरुन घेतल्या आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचे रहिवाशांच म्हणणे आहे.

प्रशासनाने या जलवाहिनींवरील सर्व बेकायदा नळ जोडण्या काढून देशमुख होम्स संकुलाला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी रहिवाशांची मागणी आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाण्याच्या मागणीसाठी महिला, पुरुष एकावेळी रस्त्यावर आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. काही वेळ वाहन कोंडी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करुन रहिवाशांना रस्त्यावरुन बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली. माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागात हा विभाग येतो. या संकुलाचा पाणी पुरवठा लवकर प्रशासनाकडून सुरळीत करण्यात आला नाहीतर शिळफाटा रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe water shortage in deshmukh homes in dombivli amy
Show comments