डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील सागर्ली-जीमखाना रस्त्यावरील आरई मालिकेतील बंगले, सोसायट्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत नाही. एमआयडीसी अधिकारी या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्या निषेधार्थ एमआयडीसीतील रहिवाशांनी गुरुवारी सकाळी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील आरई मालिकेतील सोसायट्या, बंगल्यांमध्ये मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी एमआयडीसी डोंंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंंकर आव्हाड यांची भेट मागितली होती. गुरुवारी सकाळी एमआयडीसीतील रहिवासी सकाळी साडे दहा वाजता एमआयडीसी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यालयात शुकशुकाट होता. एकही अधिकारी, कर्मचारी जागेवर नव्हता. अधीक्षक अभियंता भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता आव्हाड, इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यालयात उपस्थित नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. एक दुय्यम दर्जाचा अधिकारी रहिवाशांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे रहिवाशांचा संताप अनावर झाला.
मागील आठवड्यापासून घरात पाणी येत नाही. बाहेरून एक टँकर विकत घेण्यासाठी दररोज सुमारे दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागतात. दुकानातून पाण्याचा बाटला विकत आणण्यासाठी किती पैसे खर्च करायचे, असे प्रश्न रहिवाशांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले. पाण्याचे देयक भरणा करण्याचे चुकले तर तात्काळ नळ जोडणी कापण्याची कारवाई एमआयडीसीकडून केली जाते. मग आठवड्यापासून पाणी नसूनही एमआयडीसी अधिकारी शांत का बसले, असे प्रश्न रहिवाशांंनी केले. बहुतांंशी महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला दांडी मारून या आंदोलनात सहभागी होणे पसंत केले होते.

हेही वाचा – ठाण्यातील कंपनीत महिला अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग

एमआयडीसी अधिकारी ज्या वेळेत पाणी येईल सांंगतात ती वेळ कोणालाच सोयीस्कर नाही. एमआयडीसीच्या इतर भागात मुबलक पाणी पुरवठा होत आहे. मग डोंबिवली जीमखानावरील रहिवाशांचे पाणी कोण चोरत आहे. त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. एमआयडीसीतील ६० हून अधिक रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये महिला वर्ग आक्रमक होता.

खासदार, आमदारांना आमच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे आम्हाला ही आक्रमक भूमिका घ्यावी लागली, असे रहिवाशांनी सांगितले. आमच्यावर पोलीस कारवाई केली तरी आम्ही एमआयडीसी कार्यालयातून मुबलक पाण्याचे ठोस आश्वासन अधिकारी देत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

टँकर समुहाचे हित साधण्यासाठी ही कृत्रिम पाणी टंचाई केली आहे का? अशी टंचाई यापूर्वी रिजन्सी इस्टेट भागात केली जात होती. तोच प्रकार याठिकाणी सुरू झाला असण्याचा संशय रहिवाशांंनी व्यक्त केला.

कार्यालयात शुकशुकाट

शासकीय कार्यालये सकाळी पावणेदहा वाजता सुरू होतात. परंतु, एमआयडीसी कार्यालयात सकाळचे साडेदहा वाजून गेले तरी अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यालयात उपस्थित नव्हता. दोन ते तीन महिला कर्मचारी कोंडाळे करून एके ठिकाणी गप्पा मारत बसल्या होत्या. वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या दालनाबाहेरील कर्मचारी उपस्थित नव्हता, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. अधिक माहितीसाठी एमआयडीसीच्या वरिष्ठांंना संपर्क साधला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – डोंबिवली : तळोजा-खोणी रस्त्यावर प्रवाश्याला पोलीस सांगून दिवसाढवळ्या लुटले

मागील आठ दिवसांपासून डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील आरई मालिकांमधील सोसायट्या, बंगल्यांमध्ये पाणी नाही. एमआयडीसीकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. दररोज टँकर मागवून रहिवासी पाण्याची तहान भागवत आहेत. भर पावसात कृत्रिम पाणी टंचाई करून रहिवाशांना त्रास देण्याचा हा प्रकार सुरू आहे. – शैला कदम, रहिवासी.