कल्याण – मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात, एमआयडीसी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुबलक पाणी पुरवठा नागरिकांना करण्यात यावा, या मागणीसाठी रहिवासी मोर्चा, ठिय्या आंदोलन करून रस्त्यावर उतरले आहेत. हा सगळा कृत्रिम पाणी टंचाईचा प्रकार असून यामध्ये अधिकाऱ्यांची लबाडी असल्याची टीका कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली आहे.

डोंबिवली जवळील गोळवली, दावडी, सोनारपाडा, मानपाडा, एमआयडीसीतील काही भाग, डोंबिवली जीमखाना परिसरातील वस्ती, आजदे, सागर्ली, गोळवली भागातील मध्यमवर्गियांची वस्ती असलेली नवीन गृहसंकुले, कल्याणमध्ये मोहने, आंबिवली, शहाड, अटाळी रेल्वे स्थानक परिसर, पाटीलनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसची उमेदवारी हवी, तर अर्जासोबत द्यावा लागणार पक्ष निधी

शहरात पाण्यासाऱखी गंभीर समस्या निर्माण झाली असताना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, एमआयडीसी प्रशासन पूर्णपणे ढेपाळले असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. कल्याण डोंबिवली पालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी महिला लाभुनही त्यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने ही पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याची टीका संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. एमआयडीसीचे अधिकारीही अंधेरी येथील त्यांच्या मुख्यालयातील बैठकांचे निमित्त करून कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. नागरिकांच्या पाणी टंचाईच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी कार्यालयात कोणी अधिकारी उपस्थित नसतात अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

मोहने, आंबिवली परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या विषयावरून मंगळवारी माजी नगरसेवक दुर्यौधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. मूळ रहिवाशांचा पाणी पुरवठा परिसरात बांधण्यात येत असलेल्या बेकायदा चाळींचे भूमाफिया चोरून नेत आहेत. या सगळ्या प्रक्रियेला अ प्रभागातील अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मोहने, आंबिवली, अटाळी, गणेशनगर भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप रहिवाशांनी केला. हंडे घेऊन महिला अ प्रभाग कार्यालयात दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा >>>गडचिरोलीत पुन्हा कोट्यवधींचा भूखंड घोटाळा; बहीण- भावाला अटक, बनावट संमतीपत्राआधारे…

डोंबिवली जवळील गोळवली परिसरातील उच्च मध्यमवर्गीय वस्ती असलेली गृहसंकुले आणि परिसरातील दावडी, सोनारपाडा, पिसवली, टाटा नाका, आजदे, सागर्ली भागाला गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी मिळत नसल्याने या भागातील रहिवासी हैराण आहेत. टँकर समुहाचे भले करण्यासाठी अधिकारी वर्ग अशाप्रकारची कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून स्वताचे उखळ पांढरे करून घेत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा

डोंबिवली एमआयडीसी भागातील पाणी टंचाई ही अधिकाऱ्यांच्या लबाडीचा भाग आहे. मार्च ते मे या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत या भागांना पुरेशा पाणी पुरवठा होत होता. मग आता लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर अचानक ही पाणी टंचाई का निर्माण झाली आहे, असा प्रश्न करून ही कृत्रिम पाणी टंचाई आहे, अशी माहिती आमदार प्रमोद पाटील यांनी दिली.

येत्या आठवड्यात एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसी परिसर, २७ गाव भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा नागरिकांच्या पुढाकाराने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.(अटाळी परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी मोर्चा.)

Story img Loader