डोंबिवली जवळील संदप गाव हद्दीतील लोढा पार्क सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. हे प्रमाण आता दिवसभराची कुटुंबीयांची पाण्याची गरज भागवेल एवढेही येत नसल्याने संतप्त रहिवाशांनी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर मोर्चा काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुट्टी काढून रहिवासी मोर्चात सहभागी झाले होते. घरातील ज्येष्ठ नागरिक, वृध्दांनी मोर्चाला हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असताना आम्हाला पाणी टंचाईचा त्रास का असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत होता. लोढा पार्क सोसायटीतील रहिवासी प्रिया भालेराव यांनी सांगितले, सन २०११ मध्ये आम्ही लोढा पार्कमध्ये मुबलक २४ तास पाणी उपलब्ध असल्याने राहण्यास आलो. सुरुवातीची दोन वर्ष मुबलक पाणी मिळत होते. हळूहळू लोढा पार्क सोसायटी परिसरात नव्याने बांधकामे सुरू झाली. त्यानंतर लोढा पार्कला होणाऱ्या पाणी पुरवठात कपात होऊ लागली. हे प्रमाण आता २० मिनिटावर आले आहे. प्रत्येक कुटुंबाला किमान दिवसभर जेवढी पाण्याची गरज लागते तेवढे पाणी उपलब्ध आवश्यक आहे. तेवेढ पाणी उपलब्ध नसल्याचे प्रिया यांनी सांगितले.

लोढा पार्क सोसायटीत एकूण सहा पाखे (विंग्ज) आहेत. सात माळ्याच्या संकुलांमध्ये एकूण १८२ कुटुंब राहतात. पाच ते सहाव्या माळ्यावर राहणाऱ्या रहिवाशांना अनेक वेळा पाणीच मिळत नाही.

सोसायटीने स्वखर्चात, काटईचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाटील यांच्या सहकार्याने तीन ते चार कुपलनिका या भागात खोदण्याचा प्रयत्न केला. त्यालाही पाणी लागले नाही. अखेर अर्जुन पाटील यांच्या सहकार्याने लोढा पार्क सोसायटीला दररोज सहा ते सात टँकरने मोफत पाणी पुरवठा केला जातो. टँकरचे पाणी तळटाकीत घेऊन ते सर्व कुटुंबांना समप्रमाणात मिळेल अशा पध्दतीने सोडले जाते.

एमआयडीसीने पाणी पुरवठ्याचा दाब वाढवावा. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनी पासून शेवटच्या टोकाला लोढा पार्क सोसायटी आहे. मधल्या भागात अनेक गृहनिर्माण संस्था आहेत. मुख्य जलवाहिनीवरून लोढा पार्क सोसायटीला देण्यात आलेली जलवाहिनी प्रत्येक ठिकाणी काटकोनात वळवून देण्यात आली आहे. हे पाणी प्रत्येक वळणावर कमी होऊन आणि इतर सोसायट्या या जलवाहिनीवरून उच्च दाबाचे पंप लावून पाणी खेचत असल्याने शेवटच्या टोकाला असलेल्या लोढा पार्क सोसायटीला पुरेसे पाणी पोहचत नाही. ही बाब एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे, असे प्रिया भालेराव यांनी सांगितले.

मुख्य जलवाहिनी ते लोढा पार्क सोसायटी दरम्यान नवीन जलवाहिनी जोडणी देण्यासाठी एमआयडीसीने सहकार्य करावे. काटकोनातील जलवाहिनीची रचना सरळ मार्गी करून द्यावी, अशी मागण्या एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे यांच्याकडे केल्या आहेत. त्यांनी पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन टंचाई दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे रहिवाशांनी सांगितले. मोर्चानंतर एमआयडीसीचे तंत्रज्ञांनी लोढा पार्कच्या जलवाहिनीची तपासणी केली.

मुख्य जलवाहिनीवरून लोढा पार्क सोसायटीला दिलेली जलवाहिनी खूप जुनी आहे. ती स्वच्छ करून घेण्याची आणि त्यानंतर काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी एमआयडीसी सहकार्य करेल असे रहिवाशांना सांगितले आहे. – सुधीर नागे , अधीक्षक अभियंता ,एमआयडीसी, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe water shortage in lodha park near dombivli sandap amy
Show comments