डोंबिवली एमआयडीसीतील सांडपाणी वाहून नेणाऱा एक चेंबर बुधवारी एमआयडीसी टप्पा दोन विभागात फुटल्याने या चेंबरधील रसायनयुक्त सांडपाणी परिसरातील रस्त्यावर आले. या भागातील नाल्यात काही पाणी वाहून गेल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. प्रक्रिया केलेले पाणी वाहून जात असताना चेंबर फुटले यामध्ये कोणाही कंपनी चालकाचा सहभाग नाही. एमआयडीसीने या चेंबरची दुरुस्ती करुन तो सुस्थित करावा, असे उद्योजकांनी सांगितले.चेंबर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन तो सुस्थितीत केला जात आहे. मुसळधार पाऊस आणि सांडपाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे हा प्रकार घडला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी-मानपाडा पोहच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला प्रारंभ

गेल्या दहा वर्षापासून एमआयडीसीत हिरवा पाऊस, कधी गुलाबी रस्ते, कधी हिरवा नाला या सारख्या प्रदुषणाच्या घटनांमुळे एमआयडीसीतील कंपनी चालकांवर नेहमीच टीका केली जाते. शासनाने ‌वेळोवेळी या प्रदुषणावरुन उद्योजकांवर कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एमआयडीसीतील आशापुरा परिसरात एका रासायनिक कंपनीचे चेंबर फुटले असून त्यातून उत्पादित प्रक्रियेतील लाल रंगाचे सांडपाणी बाहेर येत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांना कंपनी चालक, परिसरातील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वीच केल्या आहेत. मात्र ही तक्रार अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेली नाही. आता हेच सांडपाणी याच परिसरात असणाऱ्या नाल्यात थेट जात असून रस्त्यावर देखील पसरले आहे. परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या पाण्यातून वाट काढून जावे लागते. या परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असतानाच या पाण्यातून वाट काढणे कठीण झाले आहे, असे या भागातील रहिवासी शशिकांत कोकाटे यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत चेंबर दुरूस्ती आणि साफसफाई झाली नाही तर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे.

Story img Loader