डोंबिवली– डोंबिवली जवळील कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातून वाहत असलेल्या नाल्यातील मलपाणी परिसरातील रस्त्यावर वाहत आहे. या मलपाण्याच्या दुर्गंधीने कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील रहिवासी त्रस्त आहेत. या भागात दुर्गंधी, घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातून पूर्वीपासून नाला वाहतो. हा नाला यापूर्वी उघडा होता. परिसरातील सांडपाणी, मलपाणी या नाल्यातून वाहत होते. आता या नाल्याच्या परिसरातून जेएनपीटीकडे जाण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आला.

हेही वाचा >>> ठाण्यात कर्करोग रुग्णालयाची उभारणी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी भुमीपुजन

नवीन बांधणीत नाला बंदिस्त करण्यात आला आहे. आता दुर्गंधी पसरणार नाही किंवा परिसरात पावसाळ्यात मलपाणी रस्त्यावर येणार नाही, असा निश्वास रहिवाशांनी सोडला होता. पाऊस सुरू झाल्यापासून नाल्यातील मलपाणी कोपर पूर्व भागातील वाट मिळेल त्या रस्त्यावरुन वाहत आहे. पूर परिस्थिती असली की हे घाणीचे पाणी घरात शिरते. अनेक दिवस ही दुर्गंधी घरातून जात नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

पाथर्ली, गोग्रासवाडी, संत नामदेव पथ, संगीतावाडी, शिवमंदिर, दत्तनगर परिसरातील मलपाणी आयरे भागात प्रक्रिया करण्यासाठी मलवाहिनीतून आणले जाते. हे पाणी प्रक्रिया करुन नंतर नाल्यात सोडले जात होते. आता नाला बंदिस्त केल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी नाल्याच्या कडेला मलपाण्याची वाहिनी आणून सोडली आहे. ही वाहिनी नाल्याच्या आतील भागात सोडा. यामुळे हे मलपाणी नाल्याच्या बाहेर येणार नाही. नागरी वस्तीला या मलपाण्याचा त्रास होणार नाही, अशी सूचना म्हात्रेनगर प्रभागाचे माजी नगरसेवक विशू पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना केली होती. अनेक पत्रे आपण यासंदर्भात पालिकेत दिली आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, असे पेडणेकर म्हणाले.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षा चालकांच्या  तक्रारी करण्यासाठी ‘आरटीओ’कडून सेवा क्रमांक

पावसाळ्यात नाल्याच्या कडेला आणून ठेवलेल्या अर्धवट वाहिनीचा त्रास पावसाळ्यात होईल. ते पाणी रस्त्यावर वाहून येईल याची पूर्वकल्पना अधिकाऱ्यांना देऊनही पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता पाऊस सुरू झाल्यापासून पावसाचे पाणी, गोग्रासवाडीपासून वाहून येणारे मलपाणी कोपर भागात वाहून येते. एकाच वेळी हे पाणी कोपर भागात आले की नाल्यात जाण्यापूर्वी ते रस्त्यावर वाहून येते. परिसरात पसरते. या मलपाण्यावर प्रक्रिया केलेली नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. रात्रीच्या वेळेत या दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास होतो, असे रहिवाशांनी सांगितले. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात अनेक भूमाफियांनी अनेक ठिकाणी मातीचे भराव बेकायदा चाळी, इमारती बांधण्यासाठी टाकले आहेत. त्यामुळे जागोजागी हे पाणी अडून राहते. रेल्वे पुलाखालून वेगवान प्रवाहाने पाणी वाहून गेले असते, पण तेथे पत्र्यांचे अडथळे उभे करण्यात आले आहेत. मुसळधार पाऊस असला की हे मलपाणी पत्र्यांना अडून माघारी येऊन बाजुच्या वस्तीत शिरते, असे रहिवाशांनी सांगितले.

Story img Loader