ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने मागील महिन्यात नवी मुंबई येथील एका संस्थेविरोधात बेकायदेशीररित्या चर्चमध्ये आश्रमशाळा चालविल्या प्रकरणी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांची बाल कल्याण समितीतर्फे चौकशी करण्यात आली होती. या चौकशी दरम्यान संस्थाचालका विरोधात एका मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे नवी मुंबई पोलीस ठाण्यात सबंधित संस्थाधारक राजकुमार येसूदासन याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, मारहाण आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आता आणखी तीन मुलींनी राजकुमार याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणूक ; मार्गावरील खड्डे भरणीची कामे सुरू

नवी मुंबई येथील सी वूड परिसरात एक चर्च आहे. या ठिकाणी बेघर वयोवृद्ध, मतिमंद नागरिकांबरोबरच अल्पवयीन मुलांचा मागील काही वर्षांपासून सांभाळ केला जातो. या ठिकाणी लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकारी वर्गाने ५ ऑगस्ट रोजी चर्चला अचानक भेट दिली. यावेळी केवळ तीन लहान खोल्यांमध्ये ४५ अल्पवयीन मुले तसेच इतर बेघर आणि मतिमंद वयोवृद्ध नागरिक अत्यंत अस्वच्छ स्थितीत राहत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. संबंधित चर्च चालविणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट या नावे २००६ साली संस्था नोंदणीकृत असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याबाबतची कोणतीही कागदपत्रे त्याला सादर करता आली नाही. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सर्व मुलांची रवानगी उल्हासनगर आणि नेरूळ येथील शासकीय बालगृहात केली होती.

हेही वाचा >>> ठाण्यातील जोशी कुटुंबाच्या गणेशोत्सवाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष

सुटका करण्यात आलेल्या मुलांची बालकल्याण समिती तर्फे चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान सुरवातीला एका अल्पवयीन मुलीने राजकुमार विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु होता. या तापसादरम्यान आणखी तीन मुलींनी राजकुमार विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. डोक्याला तेल लावून देण्याच्या बहाण्याने तसेच मी देवाचा दूत आहे तुमच्या सोबत गैरकृत्य कसे करेल असे सांगत राजकुमार येसुसदन याने आमच्याशी गैरकृत्य केल्याचे मुलींनी तक्रारीत म्हटले आहे. आश्रमशाळेतून सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांमध्ये १३ अल्पवयीन मुलींचा समावेश होता. यापैकी चार मुलींनी आतापर्यंत संस्थाचालकाविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. आरोपी राजकुमार याने उर्वरित मुलींसोबतही अशीच कृत्य केली असल्याची दाट शक्यता जिल्हा महिला आणि बालविकास विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून अद्यापही सर्व मुलांची चौकशी सुरू आहे.