ठाणे : कळवा येथे एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या महेश कांबळे याला विशेष पोस्को न्यायालयाने २० वर्ष सक्त मजुरी आणि २० हजार रुपये दंडाची तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट २०२१ मध्ये १३ वर्षीय मुलीवर महेश कांबळे याने लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी त्याच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ सह पोस्को ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात तात्कालीक पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश आजगावकर आणि त्यांच्या पथकाने भक्कम पुरावे गोळा करून महेश कांबळे याच्या विरोधात ठाणे न्यायालयामध्ये भक्कम पुरावे सादर केले होते.
पोस्को न्यायालयाचा निर्णय
या गुन्ह्याची सुनावणी विशेष पोस्को न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस. देशमुख यांच्या समोर झाली. न्यायालयाने महेश कांबळे यास भारतीय दंड संहितेचे कलम ३७६, ५०६ (२) सह पोस्को ३,४,६,८,११,१२ प्रमाणे दोषी ठरवुन २० वर्ष सक्त मजूरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम भरली नाही तर सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या गुन्ह्याच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्त्या म्हणून रेखा हिरवाळे यांनी काम पाहिले. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश आजगावकर, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.एस. ठाकूर, पोलीस हवालदार पाटणकर, वऱ्हाडे, शिंदे यांनी तपासा दरम्यान न्यायालयात ठोस पुरावे सादर केले.