लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील एका खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संबंधित रुग्णालय कर्मचाऱ्या विरुध्द रविवारी गुन्हा दाखल केला.

जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की तक्रारदार महिला आजारी असल्याने उपचारासाठी जुलैमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. आई रुग्णालयात दाखल असल्याने तिची अल्पवयीन मुलगी तिला पाहण्यासाठी रुग्णालयात येत होती. ती महाविद्यालयीन शिक्षण घेते. खासगी रुग्णालयातील स्वागत कक्षातील एका कर्मचाऱ्याने या अल्पवयीन मुलीबरोबर ओळख वाढवली. तिचा मोबाईल घेऊन तिच्याशी संपर्क वाढविला. तिच्याशी प्रेमाच्या गप्पा मारून तिला आपल्या जाळ्यात ओढले. कर्मचारी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत ११७ उमेदवारांना ५०० हून कमी मते

ऑक्टोबरमध्ये रुग्णालय कर्मचाऱ्याने पीडित मुलीशी लगट करून उल्हासनगर मधील एका सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी नेले. तेथे तिच्याबरोबर अश्लिल चाळे केले. पीडितेने त्याला असे प्रकार करण्यापासून रोखले. रुग्णालय कर्मचाऱ्याकडून होणारा त्रास पीडितेने आपल्या मैत्रिणीला सांगितला. तिने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला पण कर्मचाऱ्याने तिलाही शिवीगाळ केली.

रुग्णालय कर्मचाऱ्याकडून होणारा त्रास वाढू लागल्याने पीडित मुलीने घडत असलेला प्रकार आपल्या आई, वडिलांना सांगितला. हा प्रकार ऐकून मुलीच्या आई, वडिलांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून संबंधित रुग्णालयाच्या कर्मचाऱ्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी लैंगिक छळ, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पाॅक्सो) कायद्याने रुग्णालय कर्मचाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual harassment case against private hospital employee in kalyan mrj