शब्द भावनांना वाट मोकळी करून देतात. कल्पनेतील विश्वाला लेखणीतून कागदावर उतरवण्याचे काम शब्द करतात. कधी ते ज्ञानाची कास धरतात तर कधी विकासाला साथ देतात. कधी पर्यावरणाशी गट्टी करतात तर कधी क्रोधातून व्यक्त होतात. एखादा लेख लिहिताना नेमका अनुभव अथवा घटना मांडताना कोणते शब्द योजावेत, याचा लपंडाव लेखकाच्या मनात सुरू असतो. त्यातूनच चांगल्या सकस साहित्याची निर्मिती होत असते.

इंद्रधनु आणि मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे गेली काही महिने नियमितपणे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘शब्दयात्रा’ हा पुस्तक अभिवाचनाचा उपक्रम राबवीत आहेत. गेल्या रविवारी या उपक्रमाचा ११ वा भाग सादर झाला. रविवारची सकाळ, सोबतीला सकस साहित्याचे अभिवाचन या उपक्रमाला रसिक ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यातून त्यांच्या ज्ञान आणि अनुभवाची कक्षा रुंद व्हावी, हा यामागचा हेतू आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. शरदकुमार घाटे यांनी मंगेश पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ या काव्यसंग्रहातील निसर्ग कवितांचे वाचन केले. विशेष म्हणजे ८३ वर्षांच्या शरदकुमार घाटे यांचा अभिवाचनाचा उत्साह दांडगा होता. कविता जाणून घ्यायला त्या वातावरणात जाणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कवी अरुण म्हात्रे यांनी पाडगावकरांची ‘संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा हिरव्या लहरीमधूनी शीळ घालितो वारा’ ही कविता सादर केली. छोटी-मोठी गोष्ट घडली तरी मनाला त्रास होतो. कधी कधी बुद्धीचे ऐकावे की मनाचे हे कळेनासे होते. अशा वेळी जीवनमूल्यांचा उपयोग कसा करावा याविषयीचा एक स्वलिखित लेख डॉ. श्रीकृष्ण म्हसकर यांनी वाचला. या लेखातून माणुसकी, जीवनमूल्य म्हणून पाळणे गरजेचे असते. सच्चेपणा, माणुसकी, प्रामाणिकपणा आदी १८ मूल्ये ही दुसऱ्यांना सांगण्यासाठी नसून अमलात आणण्यासाठी असतात, याचे सुरेख वर्णन आहे. त्यानंतर त्यांनी नेमकं काय बिघडलं हे समजत नाही आणि जीवनाचे गणित काही वेगळेच असते, अशा दोन स्वरचित कविता वाचल्या. साहित्याचा आनंदानुभव घेणे ही कल्पना या कार्यक्रमातून साकार होत असल्याची भावना यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने व्यक्त केली. त्यानंतर चैतन्य साठे यांनी ‘निसर्गायन’ या पुस्तकाचे अभिवाचन केले. दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात पर्यावरणाच्या बाबतीत समस्या का आणि कशा निर्माण झाल्या आहेत. मानवाने त्या कशा पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे, याबद्दलचे सविस्तर विवेचन आहे. निसर्ग विज्ञान, तत्त्वज्ञान असे अनेक विचार घेऊन त्यांनी या विषयाची मांडणी केली आहे. पर्यावरणदिनाच्या पाश्र्वभूमीवर दिलीप कुलकर्णीचे हे मुक्तचिंतन उपस्थितांना अंतर्मुख करणारे ठरले. त्यानंतर चैतन्य साठे यांनीच ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्यांची’ हे अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अभिवाचन केले. जीवन आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध आहे, हे या पुस्तकाच्या अभिवाचनाने अधोरेखित केले. या अभिवाचनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची गर्दी अधिक होती. मात्र त्याचबरोबर तरुणांनीही अशा उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘इंद्रधनू’ संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आले.

Story img Loader