विविध नक्षी, देवदेवतांच्या प्रतिमा उमटवणाऱ्या दिव्यांना मागणी
शलाका सरफरे, ठाणे</strong>
दिवाळी हा दीपोत्सव. त्यामुळे दिवाळीआधी बाजारांत दरवर्षी विविध प्रकारचे, आकारचे दिवे, पणत्या दाखल होत असतात. यंदाही तोच कल दिसत असून या वर्षी बाजारात आलेले ‘शॅडो’ दिवे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणपती, लक्ष्मी अशा देवदेवतांचे किंवा आकर्षक नक्षीच्या पाटय़ा असलेल्या या दिव्यांतून उजळणारा प्रकाश भिंतीवर या प्रतिमा उमटवतो. या दिव्यांना त्यामुळे यंदा मागणी आहे.
यंदा बाजारात दिव्यांमध्ये शॅडो दिव्यांचा ट्रेण्ड असून देवीदेवतांची छबी असलेल्या आकर्षक दिव्यांना ग्राहकांची मागणी आहे. याशिवाय यंदा दिवाळीत रोषणाईसाठी मातीच्या दिव्यांपासून ते चिनी रोषणाईच्या माळांपर्यंत असंख्य पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. बाजारात पाण्यावर तरंगणाऱ्या, कमळांच्या आकारातील पणत्या, हत्तीच्या पाठीवरील दिवे, शंखाच्या आकाराचे दिवे अशा पणत्यांना ग्राहकांची मागणी आहे. तसेच घरातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी सेलवर चालणाऱ्या पणत्याही लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळ्या आकारातील रोषणाईच्या एलईडी माळाही बाजारात दाखल झाल्या आहेत. या माळा १०० पासून ३००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
शॅडो दिवे असे..
धातूच्या पणत्यांना सोनेरी रंग देण्यात आला आहे. त्यावर जाळीदार तबकडीत मेणाचा दिवा ठेवण्यात येतो. तबकडीच्या एका बाजूला धातूच्या पाटीवर विविध आकार कोरलेले असतात. हा दिवा पेटताच हे आकारांची मोठी प्रतिमा भिंतीवर पडते. एका दिव्याची किंमत ८० ते १०० रुपये आहे.