गेल्यावर्षी पत्नीने केलेल्या आत्महत्ये बाबत गुन्हा केला नसताना आईला व स्वतःला भोगावी लागलेली शिक्षा यामुळे नैराश्य आलेल्या पतीने व  अकरा वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील आसनगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून वडिलांनी मरणापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीच्या अनुषंगाने शहापूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसनगाव येथील विकास केदारे यांनी आपली अकरा वर्षाची मुलगी आर्या सह आत्महत्या केली असून याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी विकासची पत्नी मोनालीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी विकास व त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आपण काही गुन्हा केलेला नसताना विकास आणि त्याची वयोवृद्ध आई या दोघांनाही या प्रकरणात शिक्षा झाल्याचा आरोप मृत विकासने चिठ्ठीमध्ये व्यक्त केला आहे.

सुसाईड नोटमध्ये पोलीस तपासाचा केला उल्लेख

आत्महत्येपूर्वी विकासने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत शहापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांवरही बोट ठेवलं असून “माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे पण आता सहन होत नाही. मी बरबाद झालोय, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली, स्वतःचा अति प्रामाणिकपणा नडला. माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचे माझे स्वप्न होते. आर्याकडे पाहून उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण असह्य होत आहे. आर्या आणि मी स्वतःच्या मर्जीने आमचं जीवन संपवित आहोत”, असे चिठ्ठीत म्हटले आहे. या चिठ्ठीच्या अनुषंगाने तपास सुरू करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahapur man commits suicide after police inquiry in wife death case pmw
Show comments