कल्याण : उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बरोबर जाण्यास नकार देणारे शहापूरचे राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला. आपण अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आ. दरोडा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. राष्ट्रवादीमधून फुटून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीमधील ३५ ते ४० आमदार गेले.
शहापूर विधानसभेचे आमदार दरोडा यांनी पवार यांच्या बरोबर जाण्यास नकार दिला होता. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आपणास मंत्री पदासाठी विचारणा करण्यात आली. परंतु, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर त्या मंत्रिमंडळात आपणास मंत्री किंवा राज्यमंत्री पद नको, अशी आक्रमक भूमिका आ. दरोडा यांनी घेतली होती. आपण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे दरोडा यांनी स्पष्ट केले होते.
विकास झाला पाहिजे. पक्ष टिकला पाहिजे यासाठी शरद पवार यांनी दिलेला आदेश आम्ही पाळणार आहोत, असे आ. दरोडा यांनी स्पष्ट केले होते. गेल्या काही दिवसांपासून दरोडा यांनी अजित पवार गटात दाखल व्हावे म्हणून राष्ट्रवादीमधील काही मंडळी प्रयत्नशील होती. शहापूर विधानसभा क्षेत्रातील नागरी विकास कामे मार्गी लावायची असतील तर आता वित्त खाते हाती असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दरोडा यांनी नरमाईची भूमिका घेऊन अजित पवार गटात सामील होणे पसंत केले असल्याचे कळते. विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आ. दरोडा यांनी हा निर्णय घेऊन अजित पवार यांचे सभागृहातील बलाबल वाढविण्यास साहाय्य केले आहे.