लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील यशराज कला मंचतर्फे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबर रोजी ठाकुर्ली पुलाजवळील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेच्या सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे.
यशराज कला मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक ताम्हनकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. या कार्यक्रमात डोंबिवली जिमखान्याचे विश्वस्त आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक मधुकर चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोककलांचा अभ्यास, प्रचार-प्रसार करण्यात, रुजविण्यात प्रा. खांडगे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला, असे ताम्हनकर यांनी सांगितले.
हेही वाचा… गंजलेल्या विजेच्या खांबामुळे दुर्घटनेची शक्यता; डोंबिवली एमआयडीसीतील प्रकार
या पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी यशराज कला मंचतर्फे लोककलांच्या नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. यापूर्वी डाॅ. खांडगे यांना संगीत नाटक अकादमी, डाॅक्टर कोमल कोठारी पुरस्कार, शिवनेरी भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.