ठाणे – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. महायुती सरकार मजबूत करण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जे सहकारी मित्र सोबत येतील त्यांचे सर्वांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. आम्ही सर्वजण हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने अथवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही, अशी स्पष्टोक्ती राज्य उत्पादन शुक्ल मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तसेच अद्याप मंत्रिमंडळात १४ जाग शिल्लक आहे, त्याचाही लवकरच विस्तार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महायुती सरकारच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आणि निर्णयांची माहिती देण्यासाठी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी संवाध साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
हेही वाचा – ठाणे: राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग
मागील वर्षभराच्या कालावधीत महायुती सरकारने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून एकनाथ शिंदे यांनी काम केले. राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला होता, त्याला संकटातून सोडवण्याचे काम महायुती सरकारने केले. एनडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. तसेच राज्यात २९ जलसिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे राज्यातील काही लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा महायुती सरकारने मिळवून दिला. यांसारखे विविध निर्णय राज्य सरकारने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत घेतले आहेत. तर शासन आपल्या दारी या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी शंभूराज देसाई यांनी दिली.
हेही वाचा – डोंबिवलीमध्ये दहाजणांची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
पोपटाच्या चिठ्ठ्या खोट्या
संजय राऊत यांचे सरकार पडणार याबाबतचे अंदाज वारंवार चुकत आहेत. भविष्य सांगणारा पोपट ज्या पद्धतीने चिठ्ठ्या काढतो त्या पद्धतीने संजय राऊत महाराष्ट्रातील राजकारणातील अंदाजांबाबत गेल्या वर्षभरापासून चिठ्ठ्या काढत आहेत. मात्र त्यांचे सगळे अंदाज चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना अजिबात गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे मतही शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.