कळवा वगळता वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त बदल्यांचे आदेश मागे
ठाणे : महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव आणि वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्या बदल्यांचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले होते. परंतु हे आदेश धुडकावून लावत दोघांनी बदल्या रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरु केली होती. असे असतानाच अचानकपणे कळवा वगळता वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त बदल्यांचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागे घेतले असून सहाय्यक आयुक्तांनी राजकीय वजन वापरल्यामुळेच पालिकेच्या वरिष्ठांवर आदेश मागे घेण्याची नामुष्की ओढावली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटले असून या बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर टीका होत आहे. असे असतानाच पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. तर, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. ठाणे महापालिकेत बदली झालेले सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याकडे कळवा प्रभाग समितीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी कळव्याचाा पदभार घेतला होता. तर, बदल्यांचे आदेश धुडकावून लावत समीर जाधव आणि सचिन बोरसे हे बदलीच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. या उलटया बदल्या रोखण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांचीधावपळ सुरु होती. यामुळे पालिकेत बदल्यांचा सावळागोंधळ सुरु असल्याचे चित्र होते. या दोन्ही अधिकाऱ्यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून चोवीस तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाहीतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. असे असतानाच पालिका प्रशासनाने कळवा वगळता वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समिती सहायक आयुक्त बदल्यांचे आदेश मागे घेतले आहेत. यामुळे कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव यांची निवडणुक विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी सुबोध ठाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सचिन बोरसे यांच्याकडे वर्तकनगर प्रभाग समितीचा तर अजय एडके यांच्याकडे वागळे इस्टेट प्रभाग समितीचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.