ठाणे : सायबर गुन्हे करून पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी फसवणूकीचे पैसे बेरोजगार, अशिक्षितांच्या खात्यात वळवून पुन्हा ती रक्कम आपल्या खात्यात वळते करणाऱ्या एका टोळीला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या महिन्याभरात त्यांनी नागरिकांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता असल्याने याप्रकरणाचा तपास शांतीनगर पोलिसांकडून सुरू आहे.
अब्दुल अन्सारी (२३), आतिक अन्सारी (२०) आणि मोहम्मद अन्सारी (२०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून १७ वर्षीय दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ मोबाईल, वेगवेगळ्या बँक खात्याचे १२ डेबिट कार्ड, १७ धनादेश, बँक खातेपुस्तिका आणि पॅनकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. भिवंडीतील फातमानगर परिसरातील एका घरामध्ये बसून टोळी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शांतीनगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून अब्दुल, आतिक, मोहम्मद यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल आणि बँक खात्याच्या माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल (एनसीसीआरपी) या संकेतस्थळावरील माहिती तपासली असता, फसणूकीची रक्कम ते बिहार, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू येथील नागरिकांच्या बँक खात्यात पाठवित होते. हे पैसे ही टोळी डेबिट कार्ड किंवा धनादेशाद्वारे त्यांच्या मोऱ्हक्याच्या खात्यात वळते करत होते. त्या मोबदल्यात तो मोऱ्हक्या यातील काही रक्कम पाच जणांना पाठवित असे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.