डोंबिवली जवळील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील लोढा हेवन (जुना) गृहप्रकल्पातील शांती उपवन या पाच इमारतींच्या समुहातील ‘एफ’ इमारतीच्या भिंतीना शनिवारी रात्री तडे गेले. स्लॅब अचानक कोसळू लागले. जीवित, वित्त हानी टाळण्यासाठी पाच इमारतींमधील २४० कुटुंबाना तातडीने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेचे ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.
पालिकेच्या संरचनात्मक अभियंत्यांचा सल्ला घेऊन या इमारती तातडीने तोडायच्या किंवा कसे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले. लोढा हेवन गृहप्रकल्पात शांती उपवन नावाचा पाच इमारतींचा समुह आहे. या समुहातील एफ इमारतीच्या चारही बाजुने तडे, स्लॅब हळूहळू कोसळत आहेत. या इमारतीमुळे इतर इमारतींनाही धोका निर्माण झाल्याने इतर पाख्यांमुळे कुटुंबियांना अग्निशमन अधिकारी, परिसरातील रहिवाशांनी सुरक्षितरित्या घराबाहेर काढले. विस्थापित झालेले काही रहिवासी याच भागात एका शाळेत थांबले आहेत. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे जाणे पसंत केले आहे, असे साहाय्यक आयुक्त पवार म्हणाले.
हेही वाचा >>>कळवा रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्तांची कारवाई
लोढा हेवन गृहप्रकल्पातील शांती उपवन इमारती १९९८ मध्ये एका धनाढ्य विकासकाच्या मार्गदर्शनाखाली या भागातील एका लोकप्रतिनिधीच्या बांधकाम कंपनीने उभारला आहे. या लोकप्रतिनिधीच्या मातोश्रीचे नाव या गृहप्रकल्पातील इमारतींना देण्यात आले, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. शांती उपवन इमारतीची अनेक वर्ष देखभाल दुरुस्ती केली नसल्याने आणि विकासकाला वारंवार सांगुनही तोही लक्ष देत नाही, त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
शनिवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान शांती उपवन इमारतींमधील एफ इमारतीला तडे जात असल्याचे आणि स्लॅब हळूहळू धसून कोसळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे काही रहिवाशांच्या निदर्शनास आले. या इमारती मधील रहिवाशांनी ओरडा करुन इमारती मधील रहिवाशांना सावध केले. परिसरातील रहिवाशांना ही माहिती समजताच त्यांनी शांती उपवन इमारतींच्या दिशेने धाव घेतली. अनेक रहिवाशी रात्रीच्या वेळेत घराबाहेर कसे पडायचे, कुठे राहायचे, मुलांच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, असे प्रश्न करुन घरातून बाहेर पडण्यास नकार देऊ लागली. अचानक आलेल्या या संकटाने रहिवासी हादरले. अनेक घरात वृध्द, ज्येष्ठ नागरिक, लहाने बाळे आहेत. त्यांची सर्वाधिक त्रेधातिरपिट उडाली.
हेही वाचा >>>ठाणे: इंधन दरवाढ आणि कच्चा मालाच्या किंमतीमुळे धुलिवंदनचा रंग फिका; रंग, पिचकारीच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ
या भागाचा वीज पुरवठा काही वेळ खंडित करण्यात आला. लोढा हेवन, काटई, निळजे परिसर काही वेळ अंधारात होता. मोबाईल मधील विजेऱ्यांचा वापर उजेडासाठी केला जात होता. आपण घराबाहेर पडला नाही काही दुर्घटना घडली तर अनर्थ घडेल असे रहिवाशांना सांगण्यात आले. आवश्यक सामान सोबत घेऊन रहिवासी घराबाहेर पडले. लोढा हेवन मध्ये इमारती कोसळत असल्याची माहिती मिळताच निळजे, काटई परिसरातील रहिवासी बचावाच्या उद्देशाने लोढा हेवनमध्ये दाखल झाले.
कल्याण डोंबिवली महापालिका ई प्रभागाचे साहाय्यक आुक्त भारत पवार आपत्कालीन पथकासह घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या पलावा केंद्रातील दोन अग्निशमन वाहने अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाली. पाठोपाठ पोलिसांचे पथक आले.
शांती उपवन इमारतीमुळे लगतच्या इमारतीला, परिसराला कोणताही धोका, जीवित हानी होऊ नये यादृष्टीने अग्निशमन दल, पोलिसांनी विशेष कार्यवाही केली. या भागातून गर्दी हटविण्यात आली.
मुलांच्या परीक्षेचे दिवस सुरू असताना हा प्रकार घडल्याने रहिवासी अधिक तणावाखाली आहेत. शांती उपवन इमारत धोकादायक झाल्याने ती शक्तिमान हायजोक रेशर यंत्रणेच्या साहाय्याने पाडण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.
‘LODHA’ तर्फे खूलासा
“शांती उपवन’ ही इमारत लोढा/मॅक्रोटेक डेव्हलपर्सने विकसित केलेली नाही आणि २०+ वर्षांपूर्वी विकसित झालेल्या ‘लोढा हेवन’ नावाच्या विकासाशी आमचा संबंध नाही. आम्ही रहिवाशांशी सहानुभूती बाळगतो आणि मानवतावादी कारणास्तव आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास तयार आहोत.” – कंपनी प्रवक्ते