कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक शरद पाटील यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुख पदी निवड केली. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शरद पाटील यांची ओळख आहे.
बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते शिवसेना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सक्रिय होते. युवा गटाची धुरा त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये ते हिरीरिने सहभागी होऊन विद्यार्थी सेनेचे उमेदवार निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावत होते. शिवसेेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असतात. गरजू, गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सारखे उपक्रम ते दरवर्षी घेतात.
२००० ते २००५ या कालावधीत ते कल्याण पूर्वेतील गणेशनगर प्रभागाचे नगरसेवक होते. या कालावधीत त्यांनी नागरी विकासाची कामे गणेशवाडी परिसरात केली. कल्याण पूर्वेतील शिवसेना शाखा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सहसंपर्क प्रमुख पद त्यांनी सांभाळले आहे.
शिवसेेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम राबविण्यावर आणि पक्ष वाढीसाठी काम करणार आहे, असे शहरप्रमुख शरद पाटील यांनी सांगितले.