कल्याण / ठाणे : देशाच्या मुख्य नागरी समस्यांकडे राज्यकर्त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या कष्ट, मेहनतीकडे दुर्लक्ष झाले आहे. संसदीय लोकशाहीला प्राधान्य न देता नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कल्याण येथील प्रचार सभेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी पवार यांच्या कल्याण आणि शहापुरात सभा झाल्या. ऐतिहासिक घटनांचे दाखले देत त्यांनी कल्याणचे महत्व अधोरेखित केले. ‘चीनने देशाच्या सीमेवरील महत्वाचा भाग गिळंकृत केला आहे. त्याकडे मोदींचे दुर्लक्ष आहे. त्यांचे लक्ष फक्त निवडणुकीकडे आहे. यापूर्वीच्या निवडणुका लोकांच्या समस्या, त्या मार्गी लावणे या विषयावर घेतल्या जात होत्या. पण आता व्यक्तिगत टीका, टिंगल टवाळी यापलिकडे काहीही केले जात नाही,’ असा आरोप पवार यांनी यावेळी केला. संसदीय लोकशाही टिकवण्याचे महत्वाचे काम आता लोकांना करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शहापूर येथील वाशिंदमध्ये झालेल्या सभेत पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या विचारांच्या घटकांचा १०० टक्के पराभव करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ही निवडणूक देशाला योग्य रस्ता दाखविणारी ठरेल, असे आवाहन केले.

गांधी कुटुंबीयांनी देशासाठी त्याग केला. पण आता त्यांनीच देशासाठी काय केले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशी घातक प्रवृत्ती रोखण्याची ही वेळ आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticized the country dictatorship under the leadership of modi in the welfare meeting amy