ठाणे : शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी दोन ते तीन वेळा आली होती. पण, जे यश मिळायला हवे होते, ते यश त्यांना मिळाले नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. तसेच देशपातळीवर आज नरेंद्र मोदी यांच्या सारख्या करिष्मा असणारा दुसरा नेता पाहायला मिळत नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामुळे ठाण्यात कोंडी
ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद्घाटनानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसमुळे शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी उत्तर दिले. शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी दोन ते तीन वेळा आली होती. पण, जे यश मिळायला हवे होते, ते यश त्यांना मिळाले नाही, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा >>> कल्याणमधील शिवाजी चौकातील वाहतुकीत दोन दिवस बदल
राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्वाच्या असलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४८ पैकी जास्तीत जास्त जागा निवडुण आणण्यासाठी युतीतील तिन्ही पक्ष नियोजन आखत आहेत. या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणुक लढवेल, याचा निर्णय घेण्यात येईल. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची कि स्वतंत्रपणे निवडणुका लढवायाच्या याचा निर्णय घेण्याची मुभा जिल्हाध्यक्षांना देण्यात येईल, अशी माहीती त्यांनी दिली. क्रांती दिनाच्यानिमित्ताने ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन होत आहे. भविष्यात याच ठाण्यातून नवीन क्रांती घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाण्यात चुकीच्या माणसाच्या हातात पक्ष होता
मुल्ला ठाण्यात पक्ष चुकीच्या माणसाच्या हातात देण्यात आला होता, त्यांनी पक्ष कोंडून ठेवला होता, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. आता ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष आम्ही म्हणून काम करेल. मी म्हणून पक्ष काम करणार नाही, असे सांगत लवकरच अजित पवार यांची ठाण्यात जंगी सभा घेऊ, असेही ते म्हणाले.