सागर नरेकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथः कल्याण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अंबरनाथमधील सात माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच आता अंबरनाथमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश झालेल्या माजी नगरसेवक प्रदिप पाटील यांना उघडपणे फलक लावत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवार गटातील माजी नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करतात की काय या चर्चांना उधाण आले आहे. सध्या अंबरनाथ स्थानकाशेजारचे हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा >>> ठाण्याच्या जागेसाठी भाजपने घेतला उमेदवारी अर्ज

सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विविध पक्षांतून अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघही हेच चित्र पहायला मिळते आहे. मात्र सध्याच्या घडीला पक्षप्रवेश फक्त शिवसेना पक्षात होताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ शहरातील जुने जाणते आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांनी त्यांच्या सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या अर्ज भरण्याच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या प्रवेशामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात धक्का बसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या प्रवेशामुळे राजकारण तापले. त्यातच मंगळवारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शहर अध्यक्ष सदाशीव पाटील यांनी एक शुभेच्छा फलक लावला. त्या फलकात कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या प्रदीप पाटील यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. या फलकामुळे शहरभर चांगलीच चर्चा रंगली. शहरातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे दोन्ही नेते गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यातच ‘आमचे परम मित्र प्रदिप पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा’, असा मजकूर त्या फलकावर छापला आहे. त्यामुळे या खरच शुभेच्छा आहेत की येत्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या या शरद पवार गटालाही गळती लागणार अशा चर्चांना उधाण आले आहे. येत्या काळात ही शक्यताही पूर्ण होऊ शकते असे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी खासगीत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या अंबरनाथमध्ये या फलकाची मोठी चर्चा रंगली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar group leader in ambernath wish former corporator who joined shiv sena best for his future political journey zws